Raj Thackeray : सरकारचं तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरूय, मराठा समाजानं जागरूक राहावं; राज ठाकरेंचा इशारा

Raj Thackeray : मराठा आरक्षणासंदर्भातील  विधेयक विधीमंडळात एकमतानं मंजूर झालं. यासंदर्भातमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर झालं याचा आनंद आहे. मात्र, याचा कितपत फायदा होईल, याचा विचार मराठा समाजानं करावा, मराठा समाजानं जागरूक राहावं, कारण सरकारचं तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू आहे, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, "मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर झालं याचा आनंद आहे. मात्र, मराठा समाजानं जागरूक राहावं, सरकारकडून तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू आहे. तुम्हाला आठवत असेल, तर तामिळनाडूत राज्य सरकारनं अशा प्रकराचं आरक्षण दिलं आणि आता ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. त्याचं पुढे काहीच झालं नाही, राज्य सरकारला मुळात असे अधिकार आहेत का? ही गोष्ट आहे केंद्राची, सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या निर्णयाची. मी मागेही सांगितलं होतं की, हा विषय टेक्निकल विषय आहे, उगाच सरकारनं जाहीर केलं म्हणून आनंद मानण्यासारखं नाही."

Maratha Reservation : सगेसोयऱ्याच्या बाबतीत निर्णय नाहीच! मुख्यमंत्री म्हणाले, त्याच्या डिटेल्समध्ये...

सरकारला विचारलं पाहिजे, तुम्ही 10 टक्के दिलं म्हणजे, नेमकं काय दिलं तुम्ही? : राज ठाकरे 

सरकारला विचारलं पाहिजे, तुम्ही 10 टक्के दिलं म्हणजे, नेमकं काय दिलं तुम्ही? तुम्हाला या गोष्टींचे अधिकार आहेत का? पुन्हा सर्वोच्च न्यायालयात प्रकरण जाणार, त्यानंतर राज्य सरकार सांगणार सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेलंय, आम्ही काही करु शकत नाही. म्हणजे, निवडणुकीच्या तोंडावर अशा गोष्टी करायच्या, याला काही अर्थ आहे का?, असंही राज ठाकरे म्हणाले आहे. 

2018 मध्ये फडणवीस सरकारच्या काळात कायदा लागू करण्यात आला होता, त्याचं काय झालं? असा सवालही राज ठाकरे यांनी विचारला आहे. उर्वरित 10 टक्क्याचंही तेच होणार ना? राज्य सरकारला मुळात अधिकार आहेत का? या सर्व गोष्टींचे? आज देशात अनेक राज्य आहेत, राज्या राज्यांमध्ये अनेक जाती आहेत, त्यांचेही विषय आहेत, असं एखाद्या राज्याबाबत, एखाद्या जातीबाबत असं नाही करता येत, या गोष्टींवर समाजानंही लक्ष देणं गरजेचं आहे, असंही राज ठाकरे म्हणाले. 

राज्यासमोर भीषण दुष्काळाचं सावट, याकडे कोणाचं लक्ष नाही : राज ठाकरे 

राज ठाकरे म्हणाले की, "मला कळतच नाही नेमकं काय सुरू आहे? दुष्काळाचा विषय इतका मोठा आहे, फेब्रुवारीत आपण आहोत आणि राज्यासमोर भीषण दुष्काळाचं सावट आहे. याकडे कोणाचं लक्ष नाही. निवडणुका, जातीपातीचं राजकारण, आरक्षण याच गोष्टींकडे आपल्या सर्वांचं लक्ष वळवायचं आणि मूळ विषयांकडे दुर्लक्ष करायचं. लोकांना भेडसावणाऱ्या प्रश्नावर राज्यात काही सुरू आहे का? काहीच नाही..."



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply