Rain Update : मुंबई, उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस; ठाणे, नागपुरात सरीवर सरी, हवामान खात्याचा अंदाज काय?

Rain Update : सकाळपासूनच ढगाळ वातावरण असलेल्या मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली. ठाणे आणि नागपूरमध्ये सरी कोसळत आहेत. हवामान विभागानंही पुढील तीन ते चार दिवसांसाठी मुंबईत येलो अॅलर्ट दिला आहे.

मुंबई आणि उपनगरांत सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं. पश्चिम उपनगरांमध्ये काही वेळापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली आदी परिसरांत धो धो बरसत आहे. सकाळपासून आभाळ भरून आले होते. त्यामुळं पाऊस कोसळेल असा अंदाज होताच. अखेर काही वेळानं बरसण्यास सुरुवात झाली. काही ठिकाणी सखल भागात रस्त्यावर पाणी साचायला सुरुवात झाली आहे.

Pune Zika Virus Update : पुण्यात झिकाचा धोका वाढला, आणखी एकाला लागण; रुग्णसंख्या १६ वर

मुंबईला लागूनच असलेल्या ठाण्यावरही सकाळपासूनच ढग जमा झाले होते. अखेर काही वेळानं शहरात पावसानं हजेरी लावली. सरी कोसळू लागल्यानंतर शाळेत जाणारे विद्यार्थी आणि कामावर जाणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली.

नागपूर शहरातही पावसानं हजेरी लावली. काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. हवामान विभागानं पुढील तीन दिवस येलो अॅलर्ट दिला आहे. विदर्भात भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आदी ठिकाणी पुढील दोन तास पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला मुंबई आणि उपनगरांना मुसळधार पावसानं झोडपून काढलं होतं. मुंबईची तुंबई झाली होती. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला मोठा फटका बसला होता. रस्त्यांवर पाणी साचलं होतं. तर रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यानं वाहतूक रुळावर येण्यास बरेच तास लागले होते. मुंबई आणि ठाण्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली होती. दुसऱ्या दिवशीही खबरदारी म्हणून अनेक जिल्ह्यांतील शाळांना सुट्टी जाहीर झाली होती. मात्र, काही ठिकाणं अपवाद ठरली. तर मुंबईत बऱ्यापैकी उघडीप दिली होती. मात्र, आज सकाळपासूनच पावसानं पुन्हा हजेरी लावली. हवामान विभागानंही मुंबईला पुढील तीन ते चार दिवस येलो अॅलर्ट दिला आहे. वातावरण ढगाळ राहणार असून, दिवसभर पावसाची रिपरिप सुरू राहणार असल्याचाही अंदाज आहे.

पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगडसह कोकणातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधारेचा अंदाज वर्तवला आहे. या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply