Pune Terrorist : कोंढव्यात दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यास ATS कडून अटक, समोर आली मोठी अपडेट

Pune - पुण्यातील कोंढवा परिसरात दहशतवाद्यांना आश्रय देण्यास मदत केल्याप्रकरणी पुणे दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) एकाला अटक केली आहे. दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या व्यक्तीचे नाव निष्पन्न झाले आहे. परंतु एटीएसकडून त्याचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.

पुणे पोलिसांनी १८ जुलै रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास कोथरूड येथील बधाई चौकातून आरोपी मोहम्मद इम्रान मोहम्मद युसुफ खान (वय २३) आणि मोहम्मद युनुस मोहम्मद याकुल साकी (वय २४, दोघेही रा. ए/१, बिल्डींग फ्लॅट क्रमांक १७, चेतना गार्डन, मिठानगर, कोंढवा. मूळ रा. रतलाम, मध्यप्रदेश) यांना अटक केली होती. तर त्यांचा साथीदार शहानवाज आलम हा पसार झाला आहे. त्यांच्याविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान दोन्ही अटकेत असलेले आरोपी राष्ट्रीय तपास (एन.आय.ए.) यंत्रणेकडील गुन्ह्यात फरारी असल्याचे आणि त्यांच्याविरुध्द प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केल्याची माहिती समोर आली होती. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस महासंचालकांनी गुन्ह्याचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे वर्ग केला होता. कोथरूड पोलिसांनी २२ जुलै रोजी गुन्हा सोपविल्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाने आरोपींकडे तपास सुरु केला.

या तपासात आरोपींनी दिलेल्या माहितीवरुन कोंढवा येथील एका घरातून लॅपटॉप, टॅब, वजनकाटा, ड्रोन, नकाशा, बॅटरीसेल, इलेक्ट्रॉनिक्स सोल्डरींग गन, केमिकल पावडर व वेगवेगळी उर्दू व अरेबिक भाषेतील पुस्तके असे साहित्य जप्त करण्यात आले.

Pune Crime : शिवाजीनगर परिसरात नदीत सापडला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; शहर परिसरात खळबळ

आरोपींच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेली पावडर तज्ज्ञांकडून तपासली असता ती स्फोटक पदार्थ असल्याबाबत प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. तसेच, आरोपींनी जंगल परिसरात राहण्यासाठी घेतलेले तंबूही जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेले साहित्य तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

आरोपींनी देशाच्या एकतेस, अंखडतेस आणि सुरक्षिततेस धोका निर्माण करण्याच्या उद्देशाने एकत्र येऊन बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. तसेच साहित्य बाळगल्याप्रकरणी गुन्ह्यामध्ये यु.ए.पी.ए. च्या कलमांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

त्यानंतर न्यायालयाने त्यांच्या पोलिस कोठडीत वाढ केली आहे. आरोपींच्या फरार झालेल्या साथीदाराचा आणि अटक आरोपींना फरार कालावधीत मदत करणाऱ्या व्यक्तींचा तपास करण्यात येत आहे, अशी माहिती 'एटीएस'चे पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी दिली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply