Pune : भूसंपादनाअभावी रखडलेल्या स्पाइन रस्त्याचे काम प्रगतिपथावर; ‘या’ चार महामार्गाला जोडणार रस्ता

Pimpri : पुणे-नाशिक महामार्गावरील वखार महामंडळ गोदाम चौक ते पुणे-मुंबई महामार्गावरील भक्ती-शक्ती चौकाला (निगडी) जोडणाऱ्या स्पाइन रस्त्याचे भूसंपादनाअभावी वीस वर्षांपासून रखडलेले त्रिवेणीनगर येथील रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे या दोन्ही महामार्गांसह मुंबई-बंगळुरू महामार्ग (देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्ग) आणि पुणे-मुंबई मार्गही जोडले जाणार आहेत. त्यामुळे मुख्य रस्त्यांवरील वाहनांची गर्दी कमी होणार असून, शहरातील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होईल.

निगडीतील भक्ती-शक्ती चौकातून नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या ५५० मीटर लांबी असलेल्या या रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. सध्या ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. या रस्त्यामुळे पुणे-नाशिक महामार्ग, जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि निगडी भक्ती-शक्ती चौकादरम्यान वाहतूक दळणवळण सुधारणे आणि शहरातील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पातील मंजूर आराखड्यातील २५० बाय ७५ मीटर भूभागाच्या ताब्याचा प्रश्न मिटल्यानंतर जलद गतीने प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. मंजूर विकास आराखड्यानुसार हा रस्ता ७५ मीटर रुंदीचा आहे. सद्य:स्थितीत ३७ मीटर रुंद रस्त्याचे काम सुरू आहे. १२ मीटर रुंदीच्या दोन मार्गिका आहेत. मध्यभागी नऊ मीटर रुंदीचा उच्चक्षमतेचा ‘मास ट्रान्झिट’ मार्ग असणार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंस दोन मीटर रुंदीचे ‘पेव्ह शोल्डर’ असणार आहेत. सध्या दुहेरी मार्गाचे २७० मीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

Metro Subway: १०० कोटींचा खर्च, ३०६ मीटर लांबी; मंत्रालय-विधान भवन जोडणारा सबवे पुढच्या वर्षी खुला होणार

निगडी येथील भक्ती-शक्ती चौकातून पुणे – नाशिकआणि जुन्या पुणे-मुंबई महामार्गाला जोडणाऱ्या त्रिवेणीनगरमधील रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरात मुख्य रस्त्यांवरील अवजड वाहनांची संख्या कमी होणार आहे. पर्यावरणपूरक वातावरण टिकवून ठेवण्यास मदत मिळणार आहे. वाहतूककोंडी कमी होऊन प्रवाशांचा वेळ आणि इंधनाची बचत, तळवडे माहिती आणि तंत्रज्ञाननगरीमार्गे चाकण एमआयडीसीला जोडण्यात महत्त्वाचा दुवा म्हणून काम करणार आहे. जलनिःसारण, पावसाळी पाण्याचा निचरा त्वरित होऊन प्रदूषण कमी होईल, असा महापालिकेचा दावा आहे.

मुख्य रस्त्यावरील वाहनांची कोंडी कमी होऊन कमीत कमी वेळेत प्रवास सुखकर व्हावा, यासाठी निगडीतील भक्ती-शक्ती चौकातून राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. या रस्त्याच्या काही भागातील भूसंपादनाचा प्रश्न सुटल्यानंतर जलद गतीने काम पूर्ण करून रस्ता वापरासाठी खुला करण्याचे प्रयत्न आहेत, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply