Pune News : विरोध कायम तरीही बालभारती पौड फाटा प्रकल्पाला स्थगिती नाहीच

पुणे : वेताळ टेकडीवरील बालभारती पौड फाटा प्रकल्पाला विरोध करत सुरू असताना या प्रकल्पाला कोणतीही स्थगिती दिलेली नाही. या निविदेसाठी पुढील दोन आठवड्यात अटी व शर्ती निश्‍चीत करण्याचे काम सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, आज महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनेने या प्रकल्पास विरोध करत हा प्रकल्प करण्यापेक्षा सार्वजनिक सेनापती बापट रस्ता ते कोथरूड यामार्गावरील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करा अशी मागणी करण्यात आली.

पुणे महापालिकेने अडीचशे कोटी रुपये खर्च करून बालभारती ते पौड फाटा या दरम्यान वेताळ टेकडीवरून नवीन रस्ता आखला आहे. पण या प्रकल्पामुळे वेताळ टेकडीवरील जैवविविधता धोक्यात येत असल्याने त्यास पर्यावरण प्रेमी नागरिकांनी विरोध केला आहे. त्याविरोधात सातत्‍याने विविध मार्गांनी आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनकर्त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन हा प्रकल्प रद्द करण्याची मागणीही केली आहे.

मनसे जनाधिकार सेनेचे अध्यक्ष हेमंत संभूस, सरचिटणीस अनिल राणे, उपाध्यक्ष विशाल शिंदे, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, बाबू वागस्कर यांच्या शिष्टमंडळाने आज महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली.

या प्रकल्पामुळे विधी महाविद्यालय रस्त्यावरील वाहतूक कमी होणार नाही, केवळ १२ टक्के कोंडी सुटणार आहे. या रस्त्यामुळे पैशाचा अपव्यय, पर्यावरणाचा ऱ्हास होणार असल्याने प्रकल्प फायदेशीर नाही. त्यामुळे तो रद्द करावा. त्यापेक्षा हा निधी या भागातील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी वापरावा, पीएमटी व्यवस्था सुधारावी अशी मागणी केल्याचे संभूस यांनी सांगितले.

मार्च महिन्यात निघणार होती निविदा

या प्रकल्पाची निविदा रद्द केलेली नाही, सध्या निविदेच्या अटी व शर्ती नश्‍त करण्याचे काम सुरू आहे. त्यास दोन आठवडे लागतील, असे पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले. दरम्यान, बालभारती पौड फाटा प्रकल्पाचा अभ्यास झाला असल्याचे सांगत मार्च महिन्याच्या अखेरीस या प्रकल्पाची निविदा काढली जाणार होती.

मात्र, आता प्रशासनाने या निविदेच्या अटी व शर्ती निश्‍चीत झाल्या नसल्याचे सांगत आणखी दोन आठवडे तरी निविदा निघणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, आंदोलकांकडून निविदा रद्द झालीच पाहिजे अशी आग्रही भूमिका मांडली जात असून, त्यास भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी, मनसेकडून पाठिंबा दिला जात असल्याने नेमके काय होणार याकडे लक्ष लागले आहे.

रस्ता हवा पण बोगदा नको - निकम

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सभागृहनेते नीलेश निकम यांनी पत्रकार परिषद घेऊन बालभारती पौड फाटा प्रकल्पास पाठिंबा दिला. १९९७ पासून या प्रकल्पासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे. २५ मिनिटांचा प्रवास अवघ्या तीन मिनिटात पूर्ण होईल, यामुळे इंधन, पैसे याची बचत होईल, विधी महाविद्यालय रस्त्यावरील २० गल्ल्यांमधील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल.

प्रदूषण कमी होईल यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. मात्र, पंचवटी-सुतारदरा-गोखलेनगर हा बोगदा करू नये. या प्रकल्पामुळे पानशेत पूरग्रस्तांची घरे तोडावी लागतील. तसेच पर्यावरणाचा ऱ्हास होईल असा दावा निकम यांनी केला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply