Pune : दहावी, बारावीची बनावट प्रमाणपत्र देणारी टोळी गजाआड; दोन हजार जणांना प्रमाणपत्रे

पुणे : दहावी आणि बारावीमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकडून पैसे उकळून त्यांना उत्तीर्ण असल्याची बनावट प्रमाणपत्रे दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूल आणि हिंद युनिर्व्हसिटी नावाने बनावट संकेतस्थळ सुरू केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. आरोपींनी अनेकांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणी गुन्हे शाखेने तिघांना अटक केली आहे.

या प्रकरणी कृष्णा सोनाजी गिरी, सय्यद इम्रान सय्यद इब्राहिम (दोघे रा. छत्रपती संभाजीनगर), अल्ताफ शेख (रा. परांडा, जि. धाराशिव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दहावी आणि बारावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन बनावट प्रमाणपत्र देण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. पोलिसांनी तोतया विद्यार्थ्याच्या माध्यमातून संदीप ज्ञानदेव कांबळे (रा. सांगली) याच्याशी संपर्क केला. कांबळे याने दहावीच्या प्रमाणपत्रासाठी साठ हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले होते. त्यानंतर पहिला हप्ता म्हणून कांबळेला ३९ हजार रुपये देण्यात आले. उर्वरित  रक्कम घेण्यासाठी कांबळेला पुण्यात बोलाविण्यात आले. स्वारगेट भागात त्याला सापळा रचून पकडण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत प्रमाणपत्र देण्यासाठी अनेक ठिकाणी मध्यस्थ (एजंट) नेमल्याची माहिती मिळाली.

ज्या विद्यार्थ्यांना दहावी उत्तीर्ण झाल्याची प्रमाणपत्र तातडीने हवे आहे, अशा विद्यार्थ्यांशी कांबळे आणि मध्यस्थ संपर्क साधत होते. त्यांच्याकडून पैसे घेऊन प्रमाणपत्र दिले जात होते. त्यासाठी ३५ हजार ते ५० हजार रुपये घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. नोकरी मिळवणे तसेच शासकीय कामासाठी दहावी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असल्याने अनेकांना या टोळीने गंडा घातल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply