Pune : पुरंदरमध्ये नव्या आयटी पार्कचा प्रस्ताव; हिंजवडीवरील ताण कमी करण्यासाठी विमानतळाजवळ प्रकल्प

Pune :  राज्य सरकार पुण्यात आणखी एक आयटी पार्क उभारण्याच्या दिशेने सकारात्मक पावले उचलत आहे. पुरंदर तालुक्यात तयार होणाऱ्या नव्या विमानतळाजवळ पुरंदर आयटी पार्क तयार करणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी दिली. पुरंदरमध्ये भव्य आयटी पार्क उभारण्यासाठी सरकारने कामे सुरू केली आहेत असे त्यांनी यावेळी सांगितले.

हिंजवडीमधील चुका सुधारणार
पुण्यात हिंजवडीमध्ये असलेल्या आयटी पार्कमध्ये मोठ्या संख्येने कर्मचारी काम करतात. पण या परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी आणि इतर समस्यांमुळे अनेक बड्या कंपन्यांनी त्यांचे कार्यालय स्थलांतरित करण्याचा विचार सुरू केला आहे. त्यामुळे पुण्यातच नवं आयटी पार्क उभारल्याने या कंपन्यांना मोठा फायदा होणार आहे. तसेच, हिंजवडी आयटी पार्कमधील पायाभूत सुविधा उभारताना केलेल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी सरकारला दिला आहे.

प्रक्रिया सुरू
गेल्या अनेक वर्षांपासून पुरंदर तालुक्यात आयटी पार्क उभारण्याचा विषय चर्चेत होता. शुक्रवारी आमदार विजय शिवतारेंनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केल्या नंतर मंत्री उदय सामंत यांनी याबद्दल माहिती दिली. या प्रश्नाचे उत्तर देताना सरकार पुरंदरमध्ये आयटी पार्क विकसित करण्याच्या दिशेने सकारात्मक पावले उचलत असून महसूल विभागाकडून सध्या यासाठी जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच ही जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (MIDC) सोपवण्याच येणार असून या प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे.

पुरंदर आयटी पार्कसाठी पहिली बैठक 24 जुलै 2024मध्ये पार पडली होती. त्यानंतर ओक्टोबर 3 2025 मध्ये झालेल्या बैठकीत महसूल विभागाच्या जमीनीवर आयटी पार्क उभारण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर 27 फेब्रुवारी रोजी महसूल विभागाला याबद्दल औपचारिक विनंती पत्र पाठवण्यात आलं आहे. हा प्रस्ताव मान्य होताच जमीन हस्तांतरित करून कामाला सुरूवात करण्यात येणार आहे.


कुठे असेल नवं आयटी पार्क?
पुरंदरमध्ये तयार होणाऱ्या नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळापासून प्रस्तावित जमीन केवळ 3-4 किमी अंतरावर आहे. पुरंदर तालुक्यातील दिवे, कोडीत आणि चांबळी परिसरातील 572 हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी महसूल विभागाकडून हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हा प्रकल्प पूर्ण होताच आयटी पार्कला चांगली कनेकटीव्हीटी मिळणार असून हिंजवडीसाठी एक नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. यामुळे हिंजवडीमधील ताण कमी होऊन वाहतूक कोंडी कमी होईल. तसेच, पुरंदर तालुक्यातील नागरिकांसाठी रोजगार निर्मिती होणार आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *