Pune : दंड न भरल्यास परवाना रद्द करण्याची कारवाई! पुणे वाहतूक पोलिसांचा कडक इशारा; नियमभंग करणाऱ्यांना किती दिवसांची मुदत?

Pune : वाहतूक बेशिस्तीप्रकरणी बजावण्यात आलेल्या दंडाचा भरणा येत्या ३० दिवसांत न केल्यास अशा वाहनचालकांचे वाहन परवाने रद्द करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. वाहतूक पोलिसांकडून ही विशेष मोहीम आयोजिण्यात आली असून, रस्त्यावर कारवाईसाठी पोलिस कर्मचारी नेमले जाणार आहेत.

शहरात मार्च २०१९पासून ई-चलनाद्वारे वाहतूक बेशिस्तीचा दंड पाठविण्याची प्रणाली सुरू करण्यात आली. त्यानंतर शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे बेशिस्ती टिपून कारवाईचे प्रमाण वाढवले होते. मात्र, ई-चलन मिळाल्यावर लाखो वाहनचालकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे आजतागायत दिसले आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्यास प्रवृत्त करणे, प्रलंबित दंडाची पारदर्शक पद्धतीने वसुली करणे आणि शहरातील वाहतूक शिस्त अधिक सक्षम करणे, यासाठी वाहतूक पोलिसांनी ही मोहीम आखली आहे.

वाहतूक नियमभंगाबाबत ई-चलन प्रलंबित असलेल्या वाहनाच्या मालकांना दंड रक्कम भरण्याबाबत अधिकृत नोटीस पाठविली जाणार आहे. संबंधित वाहनमालकांनी नोटीस मिळाल्यानंतर ३० दिवसांच्या आत दंडाची रक्कम भरणे आवश्यक आहे, असे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

दंड न भरल्यास कायदेशीर कारवाई
संबंधित वाहनचालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्याबाबत प्रस्ताव प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) यांच्याकडे पाठविण्यात येईल.
संबंधित चलनाचा खटला न्यायालयात दाखल करण्यात येईल.
नोटीस कशी पाठविली जाईल?
ही नोटीस वाहनमालकांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर MHPECH-G या अधिकृत शॉर्ट कोडवरून 'एसएमएस'द्वारे पाठविण्यात येईल.
ही नोटीस २६, २७, २८ फेब्रुवारी २०२६ आणि एक मार्च २०२६ या कालावधीतच पाठविण्यात येणार आहे. या कालावधीव्यतिरिक्त वाहतूक पोलिसांच्या नावाने येणारा कोणताही मेसेज संशयास्पद समजावा.
दंड कसा भरायचा?
अधिकृत वेबसाइटवरून https://mahatraf-ficechallan.gov.in दंड भरणे शक्य.
Pune Traffic Police App (PTP App) या अॅपवरून दंड भरता येतो
जवळच्या वाहतूक विभाग कार्यालयात ई-चलान मशिनवर क्यूआर कोड, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे दंड भरावा.
सायबर फसवणूक टाळण्यासाठी.
वाहतूक पोलिसांकडून कोणतीही APK फाइल पाठविण्यात येणार नाही.
वाहनचालकांनी ओटीपी कोणालाही शेअर करू नये.
केवळ नोटिशीत नमूद केलेल्या अधिकृत पेमेंट पद्धतींचाच वापर करावा.
संशयास्पद लिंक, कॉल किंवा संदेश आल्यास त्वरित जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधावा.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *