Pune : डीआरडीओ’चे शास्त्रज्ञ डॉ. कुरुलकर यांची येरवडा कारागृहात रवानगी

पुणे : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांना २९ मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी मंगळवारी (ता. १६) दिले. डॉ. कुरुलकर यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरविल्याच्या संशयावरून डॉ. कुरुलकर यांना राज्य दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) चार मे रोजी अटक केली होती. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी संपली. त्यामुळे त्यांना एटीएसने शिवाजीनगर न्यायालयात हजर केले. त्यावेळी सरकार पक्षाकडून तपास अहवाल सादर करण्यात आला.

डॉ. कुरुलकर यांचे वकील ॲड. ऋषीकेश गानू यांनी पोलिस कोठडीची आवश्यकता नसल्याची विनंती न्यायालयाकडे केली. त्यावर विशेष न्यायाधीश पी.पी. जाधव यांनी डॉ. कुरुलकर यांना २९ मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. डॉ. कुरुलकर कारागृहातील विशेष कक्षात ठेवण्यात येणार आहे.

डॉ. कुरुलकर यांना मधुमेह असल्याने त्यांना कारागृहात औषध उपलब्ध करुन द्यावे, असे आदेश न्यायालयाने दिले. परंतु त्यांना घरचे जेवण देण्याची विनंती न्यायालयाने अमान्य केली. सरकार पक्षाकडून सरकारी वकील ॲड. चंद्रकिरण साळवी यांनी बाजू मांडली.

गरज भासल्यास पॉलिग्राफ चाचणी

डॉ. कुरुलकर यांच्याकडून जप्त केलेल्या मोबाईलचा न्यायवैद्यकीय अहवाल प्राप्त झाला. त्या मोबाइलमधील संवेदनशील माहितीचे स्क्रिनशॉट काढण्यात आले आहेत. ‘एटीएस’चे अधिकारी डॉ. कुरुलकर यांची कारागृहातही चौकशी करू शकतात. तसेच, गरज भासल्यास पॉलिग्राफ चाचणी करण्यात येईल, असे ‘एटीएस’ने न्यायालयात दाखल केलेल्या अहवालात नमूद म्हटले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply