Pune : विमा पाॅलिसीच्या बहाण्याने डॉक्टरला दोन कोटींचा गंडा घालणाऱ्याला दिल्लीतून अटक


पुणे : विमा पाॅलिसी काढून देण्याच्या बहाण्याने एका डाॅक्टरांना दोन कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या चोरट्यास सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने दिल्लीतून अटक केली. आरोपींनी १८ बँकेतील ४१ खात्यांचा वापर करून फसवणूक केली असून देशभरातील अनेकांची अशा पद्धतीने फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

शहवान सलिम अहमद (रा. लक्ष्मीनगर, दिल्ली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शहरातील एका नामांकित डाॅक्टरला विमा पाॅलिसी काढून देण्याचे आमिष सायबर चोरट्यांनी दाखविले होते. विमा पाॅलिसीत गुंतवणूक केल्यास फायदा होईल, तसेच नफाही मिळेल, असे आमिष दाखविण्यात आले. त्यानंतर डाॅक्टरांकडून चोरट्यांनी वेळोवेळी दोन कोटी रुपये उकळले होते. चोरट्यांनी वेगवेगळ्या बँकांमधील खात्यांचा वापर फसवणुकीसाठी केला होता. फसवणूक झाल्यानंतर डाॅक्टरांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. सायबर पोलिसांच्या पथकाने दिल्लीतून संदीपकुमार पुत्र धर्मपाल, साहिब खान नसीर अली, तुआजिब खान अकिल अहमद यांना अटक केली होती. या गुन्ह्यातील आरोपी शहवान अहमद पसार होता. त्याचा पोलिसांकडून माग काढण्यात येत होता.

तांत्रिक तपासात शहवान अहमद दिल्लीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सायबर पोलिसांचे पथक दिल्लीत रवाना झाले. सापळा लावून त्याला ताब्यात घेण्यात आले. दिल्लीतील न्यायालयाकडून प्रवासी कोठडी मिळवून पोलिसांनी शहवानला पुण्यात आणले. पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त विजयकुमार पळसुले यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल सुपे-पाटील, चंद्रशेखर सावंत, पोलीस कर्मचारी प्रवीणसिंह रजपूत, वैभव माने, अमोल कदम, किरण जमदाडे आदींनी ही कारवाई केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply