Pune : उरुळी देवाची व फुरसुंगी गावांची नवीन नगरपालिका निर्मितीस विरोध

पुणे : उरुळी देवाची व फुरसुंगी या दोन्ही गावांची नवीन नगरपालिका निर्मिती करण्याची घोषणा गेल्या २ महिन्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. या निर्णयामुळे या दोन्ही वात सुरू असलेले विकास कामे रखडण्याची शक्यता आहे.

त्यामुळे नवीन नगरपालिकेस दोन्ही गावातील बहुतांश ग्रामस्थांचा विरोध असल्याचे उरुळी देवाची संघर्ष समितीचे सदस्य माजी सरपंच उल्हास शेवाळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. या प्रसंगी विकास भाडळे, राजेंद्र बाजारी, उपसरपंच अनिरुद्ध पाचपुते, गणेश शेवाळे, जितेंद्र तिवारी आदी उपस्थित होते. यावेळी उल्हास शेवाळे म्हणाले, ‘‘उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या दोन्ही गावांचा समावेश २०१७ मध्ये पुणे महानगरपालिकेत करण्यात आला होता.
 
त्यामुळे ही गावे पुणे महापालिकेतून वगळणे म्हणजेच एकप्रकारे न्यायालयाचा अवमान आहे. या दोन्ही गावांमध्ये महापालिकेकडून कोट्यवधी रुपयांची विकास कामे सुरू आहेत. तसेच ‘नगर रचना योजने’च्या मंजुरीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही गावांचा नियोजित विकास नुकताच सुरू झाला होता.

ही गावे महापालिकेतून वगळल्‍यास याचा परिणाम या विकास कामांवर ही होणार. तसेच नवीन नगरपालिका आल्‍यास त्यास काम करण्याकरिता किमान ३ ते ४ वर्षांचा कालावधी लागेल. त्यात येत्या काळात पूर्व भागाची नवीन महानगरपालिका निर्माण झाल्यास पुन्हा आमच्या गावांच्या नवीन महानगरपालिकेत समावेश होणार.

त्यामुळे राज्‍य शासनाने याकडे लक्ष केंद्रित करून दोन्ही गावांना पुणे महानगरपालिकेतच कायम ठेवून वाढीव कराचा मुद्दा मार्गी लावण्याची मागणी आम्ही शासनाकडे करत आहोत.’’ गावाच्या सर्वांगीण व सुनियोजित विकासासाठी महानगरपालिकाच हवी आहे. शासनाने याकडे दुर्लक्ष करत नगरपालिका निर्माण केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, तसेच न्यायालयीन लढा लढण्याचा इशारा देखील यावेळी ग्रामस्थांनी केला.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *