Pune : अनधिकृत होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर पुणे महापालिका खडबडून जागी

पुणे : किवळे येथे अनधिकृत होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर पुणे महापालिका खडबडून जागी झाली आहे. शहरात अधिकृत, अनधिकृत असे तब्बल ३९०० होर्डिंग असताना त्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

त्यामुळे महापालिकेने अधिकृत होर्डिंग व्यावसायिकांनी त्यांच होर्डिंग सुरक्षीत आहे की नाही याची तपासणी करून पुढील १५ दिवसांत अहवाल सादर करा, अन्यथा होर्डिंग अनधिकृत ठरविले जाईल, अशा इशारा अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी लेखी आदेशाद्वारे दिला आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरातील एक हजार ४०७ अधिकृत व नोटीस दिलेल्या ४३४ सह सर्व अनधिकृत होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाईल. त्यासाठी पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे (सीओईपी) सहकार्य घेतले जाईल, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत अवकाळी पावसात अनधिकृत होर्डिंग कोसळून पाच जणांचा बळी गेला. पुणे शहराच्या जुन्या हद्दीसह नवीन हद्दीत प्रत्येक रस्त्‍यावर मोठे होर्डिंग उभे केलेले आहेत. यामध्ये अधिकृत दोन हजार ४८५ आहेत. तर अनधिकृत होर्डिंग दोन हजार ६२९ होर्डिंग होते, त्यापैकी ९५३ होर्डिंग काढून टाकले आहेत. तर सुमारे २०० होर्डिंग अधिकृत झाले आहेत. शहरात अद्यापही एक हजार ४०० होर्डिंग अनधिकृत आहेत. त्यावर महापालिकेचे कोणतेही नियंत्रण नाही, त्याच्या सुरक्षेसंदर्भात गंभीर प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने परिपत्रक काढले आहे.

काय आहे आदेशात?

या वादळात होर्डिंग पडून जीवित हानी, वित्तीय हानी होऊ शकते, वाहतुकीचा खोळंबा होऊ शकतो. या घटना टाळण्यासाठी संबंधित व्यावसायिकांनी पुन्हा एकदा स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल पुढील १५ दिवसांत सादर करावा.जे व्यावसायिक अहवाल सादर करणार नाहीत, त्यांचे होर्डिंग अनधिकृत समजून त्यांना नोटीस देऊन होर्डिंग काढून टाकण्याची कार्यवाही सुरू करावी.

अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करताना प्रामुख्याने वाहतूक अडथळा ठरणारी व धोकादायक झालेले काढून टाकावेत. आकाशचिन्ह विभागाच्या उपायुक्तांनी दैनंदिन कामकाजावर नियंत्रण ठेवून अहवाल आले आहेत की नाही, याचा दैनंदिन अहवाल सादर करावा.

किवळे येथील जागामालकाला अटक

होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी जाहिरात कंपनीसह चौघांवर रावेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जागामालक नामदेव बारकू म्हसुडगे (रा. किवळे) यांना अटक केली आहे. त्यांच्यासह होर्डिंग बनविणारा दत्ता गुलाब तरस, होर्डिंग भाड्याने घेणारा महेश तानाजी गाडे, जाहिरात करणारी कंपनी व संबंधितांवर गुन्हा दाखल आहे.

महापालिकेची परवानगी न घेता, कायदेशीर बाबींची पूर्तता न करता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी न घेता होर्डिंगवर जाहिरातबाजी केल्याचा आणि पाच जणांच्या मृत्यूस व तीन जण जखमी होण्यास कारणीभूत ठरल्याचा आरोप चौघांवर आहे. पोलिस उपनिरीक्षक रवींद्र पन्हाळे यांनी फिर्याद दिली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply