Pune Mahametro : मेट्रो स्थानकांतील त्रुटी तातडीने दूर कराव्यात; छायाचित्रांसह तज्ज्ञांचे आक्षेप

पुणे - वनाज-रामवाडी मार्गावरील मेट्रोच्या चारही स्थानकांच्या संरचनेच्या कामांतील त्रुटी प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तातडीने दूर कराव्यात, अशी मागणी तज्ज्ञांच्या एका गटाने महामेट्रोकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. केंद्रीय मेट्रो रेल्वेचे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) जनक गर्ग यांच्याकडेही या तज्ज्ञांनी महामेट्रोच्या कामाबाबत छायाचित्रांसह आक्षेप नोंदविले आहेत. दरम्यान, स्थानकांची संरचना सुरक्षित असल्याचा दावा महामेट्रोने केला आहे.

शहरातील वनाज-रामवाडी मार्गावरील मेट्रोचे गेल्या वर्षी ६ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. या मार्गावर गरवारे महाविद्यालय, नळस्टॉप, आनंदनगर, वनाज ही स्थानके आहेत. त्यावर सध्या प्रवासी वाहतूक सुरू आहे. हैदराबाद मेट्रोचे माजी व्यवस्थापकीय संचालक विवेक गाडगीळ, कोकण रेल्वेचे माजी व्यवस्थापकीय संचालक डॉ. केतन गोखले, स्थापत्य अभियंता आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार शिरीष खासबारदार आणि स्ट्रक्चरल अभियंते नारायण कोचक यांच्या गटाने गरवारे महाविद्यालय ते वनाज दरम्यानच्या मेट्रो मार्गाची आणि स्थानकांची पाहणी केली. त्याच्या आधारे त्यांनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, संचालक अतुल गाडगीळ आणि ‘सीएमआरएस’कडे निवेदन पाठविले आहे.

दरम्यान, ‘सीएमआरएस’ने ‘या त्रुटींबाबत आम्हाला कल्पना आहे, आम्ही योग्य ती दखल घेऊ’, असा ई-मेलद्वारे प्रतिसाद दिल्याचे गाडगीळ यांनी नमूद केले.

मेट्रो कामाच्या दर्जा आणि गुणवत्तेबाबत दुर्लक्ष करून चालणार नाही. इतका मोठा प्रकल्प राबविताना प्रवाशांची सुरक्षितता महत्त्वाची असून तिच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आम्ही फक्त चार स्थानकांची पाहणी केली आहे. अन्य स्थानके खुली झालेली नसल्यामुळे तेथे काय सुरू आहे, याबाबत कल्पना नाही. मात्र प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी चारही स्थानकांचे तज्ज्ञांकडून स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे आहे.

- विवेक गाडगीळ, माजी व्यवस्थापकीय संचालक, हैदराबाद मेट्रो



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply