Pune Leopard News : पालकांच्या कुशीतील बालिकेला बिबट्याने पळवले

Pune Leopard News :  शिरोली खुर्द (ता. जुन्नर) येथे आई-वडिलांच्या कुशीत झोपलेली मेंढपाळांची दीड ते दोन वर्षांची मुलगी बुधवारी (ता. ११) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बिबट्याने पळवून नेली. संस्कृती संजय कोळेकर, असे तिचे नाव आहे. शेजारील उसाच्या शेताच्या बांधावर तिच्या डोक्याची कवटीची हाडे व उजव्या पंजाचा काही भाग आढळून आला.

संजय कोळेकर व त्यांचे कुटुंब नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील धोत्रे गावाचे असून, ते गेली अनेक वर्षांपासून शिरोली खुर्द येथे मेंढ्यांचा कळप चारण्यासाठी घेऊन येतात. बुधवारी रात्री शिरोली खुर्द येथे संपत मोरे या शेतकऱ्याच्या शेतात इतर मेंढपाळांसह कोळेकर यांच्या कुटुंबाचा मुक्काम होता. गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बिबट्याने चोर पावलाने येऊन कोळेकर व त्यांच्या पत्नीमध्ये झोपलेली दीड वर्षाच्या संस्कृती हिला उचलून नेले, अशी माहिती पोलिस पाटील विक्रम मोरे यांनी दिली.

Pune News : डीएसके मालमत्तेची लिलावाबाबत योग्य यादी तयार करून निर्णय घ्या; उच्च न्यायालयाचा विशेष न्यायालयाला आदेश

या घटनेची माहिती वन विभागाला प्राप्त होताच वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदिप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे पथक घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी आजूबाजूच्या शेतात मुलीचा शोध घेतला. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून शोध घेतला असता उसाच्या शेतातून बिबट पळाल्याचे निदर्शनास आले. तसेच, एका शेताच्या जवळ मुलीच्या डोक्यातील टोपडे व फ्रॉक आढळून आला. तेथील परिसरातील शेतात शोध घेतला असता सुभाष थोरात व विश्वास जाधव यांच्या उसाच्या शेताच्या बांधावर मुलीच्या डोक्याची कवटीची हाडे व उजव्या पंजाचा काही भाग आढळून आला.

दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर, जुन्नरचे पोलिस निरीक्षक किरण अवचर, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी पंडित थोरात, सागर शिंदे यांच्या पोलिस पथकासह घटनास्थळी जाऊन पंचनामा करून प्राप्त अवशेष शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. माहिती मिळताच जुन्नरचे आमदार अतुल बेनके, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी घटनास्थळी भेट दिली.

जुन्नर तालुक्यात नगर जिल्ह्यातून चाऱ्याच्या शोधात मोठ्या प्रमाणावर मेंढपाळ दाखल झाले. उघड्यावर संसार थाटून आपल्या मेंढ्यांचा बिबट्यापासून बचाव करत जगणे त्यांच्यासाठी तारेवरची कसरत आहे. तसेच, त्यांच्या स्वतःच्या जीविताला धोका निर्माण झाला. शिरोली खुर्द येथे घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. जुन्नर तालुक्यात बिबट्यांची संख्या वारेमाप वाढल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत. वन विभागानेदेखील नागरिकांच्या सुरक्षीततेसंदर्भातील उपाययोजना करून त्याबाबत समाजामध्ये जनजागृती करावी. उघड्यावर वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेबाबत दक्षता घेऊन वन विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे जून्नरचे आमदार अतुल बेनके म्हणाले.

घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून, वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी १२ पिंजरे, ८ ट्रॅप कॅमेरे, १० रेस्क्यू टीम, ३० वन अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले आहेत. उघड्यावर वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदिप चव्हाण म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply