Pune IAS Anil Ramod Suspend : ८ लाखांची लाच, घरी ६ कोटींचं घबाड सापडलं; अखेर पुण्याचा IAS अधिकारी निलंबित

Pune : लाच घेणारे पुण्याचे अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त अनिल रामोड यांना निलंबित करण्यात आले आहे. अनिल रामोड यांच्यावर राज्य सरकारकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अनिल रामोड यांच्या लाच प्रकरणी पुणे विभागीय आयुक्तालयाने राज्य सरकारला  निलंबनाचा प्रस्ताव होता. त्यानंतर त्यांच्यावर राज्य सरकारकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

सीबीआयने 9 जून रोजी पुणे विभागाचे अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त अनिल रामोड यांना तब्बल 8 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली होती. त्यानंतर सीबीआयने त्यांच्या घरावर छापा टाकला होता. यावेळी तपासात अनिल रामोड यांच्या घरी 6 कोटी रुपयांची रोख रक्कम सीबीआयला सापडली होती. तसंच 14 बेहिशेबी मालमत्तांचे पेपर्स सापडले होते. या प्रकरणामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली होती.

लाच घेणारे अनिल रामोड हे आयएएस अधिकारी असून ते पुणे विभागीय आयुक्तालयामध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून काम करत होते. त्यांना लाच घेताना अटक झाल्यानंतर पुणे विभागीय आयुक्तालयाने राज्य सरकारला त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठविला होता. अनिल रामोड हे विभागीय आयुक्तालयातील कागदपत्रांमध्ये फेरफार करेल. त्यामुळे त्याला निलंबित करण्यात यावे, अशी मागणी सीबीआयने विभागीय आयुक्तालयास पाठविलेल्या पत्राद्वारे केली होती.

सीबीआयने विभागीय आयुक्तालयास निलंबनाबाबत पाठविलेल्या पत्रानुसार आयुक्तालयाने राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना रामोड याचे निलंबन करण्यात यावे, असे पत्र पाठविले होते. त्यानंतर सचिव कार्यालयाकडून अनिल रामोड यांच्या निलंबनाच्या प्रस्तावावर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर अनिल रामो यांचे राज्य सरकारकडून निलंबित करण्यात आले.

अनिल रामोड हे मुळचे नांदेडचे आहेत. ते गेल्या दोन वर्षांपासून पुणे विभागात अतिरिक्त विभागीय आयुक्त या पदावर कार्यरत होते. रामोड यांच्याकडे वेगवेगळ्या शासकीय कामांसाठी भूसंपादन करण्याची आणि त्या बदल्यात शेतकऱ्यांना त्याचा मोबदला देण्याची जबाबदारी होती. पण रामोड हे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी कमिशन म्हणून लाखो रुपयांची मागणी करत होते. महामार्गावरील भूसंपादनाचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यासाठी त्यांनी 8 लाख रुपयांची मागणी केली होती. हेच पैसे स्वीकारत असताना त्यांना सीबीआयने रंगेहाथ अटक केली होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply