पुणे : जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांच्याप्रारूप आराखड्याला विभागीय आयुक्तांची मंजुरी

जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांच्या प्रारूप आराखड्याला विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मंजुरी दिली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जिल्ह्यात पुणे जिल्हा परिषदेमध्ये ८२ गट आणि पंचायत समितीचे १६४ गण आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने २५ जिल्हा परिषदा आणि २८४ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठीच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. जिल्हा प्रशासनाने तयार केलेली प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात आली होती. त्याची तपासणी झाल्यानंतर ही प्रभाग रचना विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आली. त्याला विभागीय आयुक्तांनी मंजुरी दिली आहे.

प्रभाग रचनेवर नागरिकांना हरकती किंवा सूचना करण्यासाठी सात दिवसांची म्हणजेच ८ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात हरकती, सूचना स्वीकारल्या जाणार असून त्यावर २२ जूनपर्यंत सुनावणी घेतली जाणार आहे. २७ जून रोजी जिल्हाधिकारी अंतीम प्रभार रचनेचे राजपत्र प्रसिद्ध करणार आहेत, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांचा प्रभागरचनेचे परिशिष्ट तीन आणि परिशिष्ट तीन (अ) जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, सर्व तहसिल कार्यालये, सर्व पंचायत समित्या याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष तयार करण्यात आला आहे. प्रभाग रचनेच्या कार्यक्रमानुसार जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत असलेल्या १३ पंचायत समित्यांचा निवडणूक विभाग, निर्वाचक गण यांच्या हरकती व सूचना ग्रामपंचायत शाखा, बी-विंग, तिसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय येथे कार्यालयीन वेळेत २ ते ८ जून २०२२ या कालावधीत स्वीकारण्यात येणार आहेत, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply