Pune : पुण्यात धक्कादायक घटना; जुन्या वादातून तरुणाला गाठून निर्घृण हत्या

Pune : पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीयेत. पुन्हा एक मोठी घटना शहरात घडली आहे. सिंहगड रस्ता परिसरात काल सोमवारी सायंकाळी एक मोठा प्रकार घडला. आनंदनगर भागात 19 वर्षांच्या तरुणावर लोखंडी हत्याराने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. मृत तरुणाचं नाव करण गिरीश काशीद (वय 19, रा. धायरी) असं आहे. काल सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास करण सिंहगड रस्त्यावरील आनंदनगरमधील संतोष हॉल परिसरात उभा होता. त्याचवेळी दोन ते तीन जण तिथे आले आणि काही समजायच्या आतच त्यांनी त्यांच्या जवळ असलेल्या लोखंडी हत्याराने करणवर हल्ला चढवला.

जुन्या वादाचा राग
हल्लेखोरांनी करणवर जीवघेणा हल्ला केला. गंभीर जखमी झालेला करण जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. हा प्रकार अचानक घडल्यामुळे परिसरात एकच धावपळ उडाली. हल्ल्यानंतर आरोपी तिथून पळ काढून फरार झाले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, करण आणि हल्लेखोरांमध्ये आधीपासून काही वाद होता. त्याच जुन्या वैमनस्यातून हा हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. भरवस्तीत दिवसाढवळ्या घडलेल्या या हत्या प्रकरणामुळे परिसरात मोठी भीती निर्माण झाली आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. दरम्यान, आरोपींची ओळख पटवण्याचं काम सुरू असताना त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची पथकं तातडीने रवाना झाली होती. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले. त्यानंतर ताब्यात घेतलेल्या तीन संशयितांची चौकशी सुरु असून पोलीस तपासात ही घटना का घडली? हे स्पष्ट होणार आहे. भरवस्तीत दिवसाढवळ्या घडलेल्या या हत्या प्रकरणामुळे परिसरात मोठी भीती निर्माण झाली आहे. सिंहगड रस्त्यावर तरुणांच्या हत्येचे आणि कोयता गँगची दहशत जास्त प्रमाणात वाढली असून अशा धक्कादायक घटना थांबणार कधी? असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.



विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *