पुणे : TDR विक्रीच्या आमिषाने व्यापाऱ्याला एक कोटींचा गंडा घालणाऱ्या आरोपीला चार वर्षानंतर अटक

पुणे : टीडीआर विक्रीच्या आमिषाने व्यापाऱ्याची एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याबद्दल दाखल झालेल्या गुन्ह्यात गेले चार वर्ष पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केली.

विजय बाबासाहेब घोरपडे असे अटक केलेल्याचे नाव आहे. घोरपडे जमीन खरेदी विक्री व्यवहार करायचा. टिंबर मार्केटमधील एका व्यापाऱ्याची २०१७ मध्ये घोरपडेची ओळख झाली होती. सिंहगड रस्ता भागातील धायरीत जमीन असल्याची बतावणी घोरपडेने व्यापाऱ्याकडे केली होती. संबंधित जमिनीवर महापालिकेकडून डीपी रस्त्याचे आरक्षण टाकण्यात आले आहे. महापालिकेकडून मोबदल्यापोटी टीडीआर (हस्तांतरण विकास हक्क) देण्यात येणार असल्याचे आमिष, घोरपडेने व्यापाऱ्याला दाखविले होते.

एक कोटी रुपयांत टीडीआर देण्याचे आमिष दाखवून घोरपडेने व्यापाऱ्याशी समजुतीचा करारनामा केला होता. व्यापाऱ्याकडून त्याने वेळोवेळी एक कोटी रुपये घेतले होते. त्यानंतर व्यापाऱ्याला टीडीआर मिळवून दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यापाऱ्याने खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

या प्रकरणात घोरपडेच्या पत्नीसह मुलावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. पत्नी आणि मुलाने न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळवला होता. त्यानंतर घोरपडे पसार झाला होता. गेले चार वर्ष पोलिसांना तो गुंगारा देत होता. घोरपडे एका नातेवाईकाकडे आल्याची माहिती मिळाल्यानंतर खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, गुन्हे शाखेतील निरीक्षक राजेंद्र बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल खंडाळे, राकेश जाधव,संदीप तळेकर, मोरे, घाडगे यांनी सापळा लावून घोरपडेला ताब्यात घेतले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply