Pune : धार्मिक मुद्द्यावर बोलणाऱ्या भाजपला ‘पढोगे तो बढोगे’ हे सांगण्याची वेळ; सचिन पायलट यांची टीका

Pune : घटनात्मक पदावर असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राज्यात येऊन सरकारच्या कामावर बोलण्याऐवजी ‘बटेंगे तो कटेंगे’ असा नारा देतात. राज्याचे उपमुख्यमंत्री व्होट जिहाद आणि मताला धार्मिक युद्ध असे संबोधतात. हे त्यांच्या पदाला शोभा देणारे नाही. धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्या भाजपला ‘पढोगे तो बढोगे’ हे सांगण्याची वेळ आली आहे, अशी टीका राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी येथे रविवारी केली.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस भवन येथे सचिन पायलट यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. उत्तराखंडमधील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते टी. एस. सिंगदेव, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रीय प्रवक्त्या डाॅ. शमा महंमद आणि प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड यावेळी उपस्थित होते. शेतकऱ्यांचे प्रश्न, सिंचन, बेरोजगारी, महागाई, रोजगार, शिक्षण, शेतमालाला हमीभाव या मुद्द्यांवर बोलण्याऐवजी भाजप पाकिस्तान, हिंदू-मुस्लिम, मंदिर-मस्जिद यावर प्रचार करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

पायलट म्हणाले की, निवडणुकीत सर्वसामान्य जनतेच्या मुद्द्यांवर बोला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील महायुती सरकारला सांगितले. मात्र, त्यांच्याकडून धर्माचा अजेंडा राबविला जात आहे. महायुती सरकारने काय कामे केली, या आव्हानाला त्यांच्याकडे उत्तर नाही. इंदिरा गांधी, राजीव गांधी, डाॅ. मनमोहन सिंग या माजी पंतप्रधानांनी देशासाठी काय केले, अशी विचारणा पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात. मात्र, दहा वर्षांत त्यांनी काय केले हे सांगत नाहीत. भाजपच्या सरकारने एका दिवसात १४७ खासदारांना निलंबित केले. काँग्रेस नेते राहुल गांधींंना संसदेत बोलण्यास मनाई केली. मात्र, आता राहुल गांधी संसदेत आणि बाहेरही आक्रमक भूमिका घेत आहेत. काँग्रेस सत्तेत असो किंवा विरोधात, मुद्द्यांवरून भटकणार नाही. यापुढेही सरकारला प्रश्न विचारले जातील.

Pune : अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !

लोकसभा निवडणुकीनंतर काही राज्यातील निवडणुका एक देश एक निवडणूक यानुसार एकत्रित घेतल्या जातील, असे सांगण्यात आले. मात्र तशी घोषणा देणाऱ्या भाजपने महाराष्ट्र आणि झारखंडची निवडणूक हरियाणा आणि जम्मू-काश्मीरबरोबर घेतली नाही. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला चांगले यश मिळाले. चारशे पारचा नारा देणाऱ्या भाजपला जनतेने २४० जागांवर मर्यादित ठेवले, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील नागरिकांना फसवून आणि गद्दारी करून महायुतीचे सरकार आले आहे. त्यांना सत्तेतून घालविण्याची वेळ आली आहे. काँग्रेस हा जुना पक्ष असून महाविकास आघाडीत त्यांच्या जागाही सर्वाधिक येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply