Pune : जन्म-मृत्यू दाखले विलंबाबाबत पुणे महापालिकेने दिली महत्वाची माहिती!

PUNE  : जन्म-मृत्यू नोंदणी करण्यासाठी, तसेच दाखले देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या केंद्रीय ऑनलाइन प्रणालीत वारंवार तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे महापालिकेकडून हे दाखले तयार करण्यात विलंब होत आहे. याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाने संबंधित यंत्रणांशी पत्रव्यवहार केला असून, ही यंत्रणा सुरळीत होईपर्यंत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे .

जन्म-मृत्यूनोंदणी, तसेच दाखले मिळविण्यासाठी नागरिकांना त्रास होत असल्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. ही यंत्रणा सतत कोलमडत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यावर पालिकेच्या आरोग्य विभागाने खुलासा केला असून, यंत्रणा सुरळीत होईपर्यंत सहकार्य करण्यास सांगितले आहे.

२०१९ पूर्वी महापालिकेतर्फे जन्म-मृत्यू दाखले दिले जात होते. मात्र, २०१९ पासून केंद्र सरकारच्या नागरी नोंदणी यंत्रणेमध्ये (सीआरएस) जन्म व मृत्यूची नोंदणी होते. देशभर सर्वत्र एकसारखेच जन्म व मृत्युदाखले दिले जावेत, यासाठी केंद्र सरकारने ही प्रणाली तयार केली आहे. याच प्रणालीचा वापर करणे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना बंधनकारक आहे.

Mumbai : सरकारी नोकरीचे आमिष दाखवून चौघांची फसवणूक, कोल्हापूरातील व्यक्तीविरोधात गुन्हा

काही महिन्यांपूर्वी या प्रणालीमध्ये बदल करण्यात आले आहेत. आतापर्यंत शहरात कोणत्याही भागात जन्म अथवा मृत्यू झाल्यास नागरिकांना महापालिकेच्या कोणत्याही क्षेत्रीय कार्यालयातून जन्म-मृत्यूचे दाखले मिळत होते. पण २४ जूनपासून या सॉफ्टवेअरमध्ये बदल केले गेले. ज्या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत जन्म किंवा मृत्यूची नोंद झाली आहे. तेथेच त्यांना दाखला मिळतो. या प्रणालीतील तांत्रिक अडचणींमुळे सर्व्हर डाउन होणे किंवा कामकाज मंदावण्यामुळे दाखल्यांच्या कामकाजावर परिणाम होत आहे.

याबाबत जिल्हा निबंधक व जिल्हा आरोग्य अधिकारी, राज्याचे उपसंचालक व उपमुख्य निबंधक तसेच केंद्र शासनाची नागरी नोंदणी पद्धती (सीआरएस) यंत्रणा यांच्याकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. तांत्रिक अडचणींमुळे दाखले वितरित करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे व सहायक आरोग्यप्रमुख डॉ. मनीषा नाईक यांनी केले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply