Pune News : बालेवाडी परिसराला दूषित पाणीपुरवठा; व्हॉल्व्हजवळच चेंबर असल्यामुळे समस्या

 

Pune : बालेवाडी परिसरात गेल्या महिन्याभरापासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. या पाण्यातून दुर्गंधी येत असून हे पाणी वापरल्याशिवाय इतर दुसरा पर्याय नागरिकांसमोर नसल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने याकडे लक्ष देऊन या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी या भागातील रहिवाशांनी केली आहे. बालेवाडी गावठाण, पाटील वस्ती, अष्टविनायक चौक व या भागातील परफेक्ट टेन, ओर्वी, मधुबन, गिनी विवियाना, पारितोषिक व मधुबन अशा अनेक सोसायट्यांसह मुंबई- बंगळूर महामार्गजवळील सरोवर हॉटेल परिसरामध्ये अनेक दिवसापासून नागरिकांना दूषित पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
दूषित पाण्याला दुर्गंधी येत असल्याने नागरिकांना पिण्यासाठी विकत पाणी घ्यावे लागत आहे, यामुळे नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. तसेच वापरण्याच्या पाण्यासाठी अन्य पर्याय नसल्याने हेच दूषित पाणी वापरावे लागत आहे. या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना पोटाचे विकार होत असून वारंवार आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक नागरिकांनी महापालिकेच्या संबंधित विभागाकडे याबाबत तक्रार नोंदविली असून प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

Nashik Accident : मद्यधुंद तरुणाचा नाशकात धिंगाणा, महिलेच्या कारला धडक, बहिण पोलीस दलात असल्याचे सांगत अरेरावी

येथील रहिवासी गणेश बालवडकर म्हणाले, "सध्या पावसाळ्याचे दिवस असून डासांमुळे अनेक आजार पसरत आहेत. अशातच आता दूषित पाण्याच्या वापरामुळे लोक आजारी पडत आहेत. प्रशासनाने यावर उपाययोजना त्वरित कराव्यात." संदीप बालवडकर म्हणाले की, मागच्या दोन वर्षांपूर्वीही या भागात दूषित पाणी येऊन अनेक लोक आजारी पडत होते. आता पुन्हा हा प्रश्न उदः भवला आहे, यावर उपाययोजना म्हणून जलवाहिनी साडपाण्याच्या चेंबरपासून हलवून दुसरीकडे टाकण्यात यावी.
याठिकाणी पाणी सोडण्याच्या व्हॉल्व्हचा दांडा गेल्या दीड वर्षापासून तुटला असून येथे लाकडी खुटी बसवली आहे. ही प्रशासनाची काम करण्याची कोणती पद्धत आहे? यामुळेच अनेक दिवसांपासून आम्हाला दुषित पाणी प्यावे लागत आहे. प्रशासनाने नागरिकांच्या जिवाशी खेळू चालवला आहे.

औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाला याबद्दल कल्पना दिली असून येथे सांडपाण्याचे चेंबर तुबल्याने मोठ्या प्रमाणात सांडपाणी जमा झाले आहे. हे पाणी काढल्याशिवाय नेमकी वाहिनीची कुठे गळती झाली आहे हे समजणार नाही. याठिकाणी व्हॉल्व्हचा तुटलेला दांडा बसविण्याचे काम त्वरित करून हा प्रश्न सोडविला जाईल.

- प्रदीप रंगदळे, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग

जलवाहिनीत मिसळतेय सांडपाणी

बालेवाडी येथे नियोजनपूर्वक पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने व्हॉल्क बसविले आहेत. त्यापैकी एक व्हॉल्व अष्टविनायक चौक येथे असून या व्हॉल्व्हच्या बाजूलाच सांडपाणी वाहिनीचे चेंबर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे चेंबर तुंबले असून सांडपाणी वाहत आहे. येथे पाणी सोडण्याच्या व्हॉल्व्हचा दांडा मोडला असून याठिकाणी लाकडी खुटी ठोकून काम चालवले जात आहे. यामुळे हा व्हॉल्व्ह सुरू केला असता त्याद्वारे हे सांडपाणी पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळले जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply