Pune : अल्पवयीनांच्या ‘उद्योगां’ची उद्योगनगरीला डोकेदुखी

Pune : अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारी विश्वाचे आकर्षण वाढू लागले आहे. खून, खुनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड यांसारख्या गंभीर गुन्ह्यात किशोरवयीनांचा वाढता सहभाग ही चिंतेची बाब ठरत आहे. अल्पवयीन असल्याने ही मुले बालसुधारगृहातून महिना-दोन महिन्यांत बाहेर येतात आणि गुन्हेगारी क्षेत्रात सहजपणे दाखल होतात. सामाजिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही बाब घातक ठरत आहे. या वाढत्या बालगुन्हेगारीला आळा कसा घालायचा, हा प्रश्न पोलिसांपुढे दिवसेंदिवस डोकेदुखी ठरत आहे.

पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत संमिश्र जीवनमान आहे. भोसरी, पिंपरी, निगडी, चिंचवड, चिखली, चाकण या भागांत लहान-मोठे कारखाने आहेत. शहरात राज्याबरोबरच परराज्यांतूनही रोजी-रोटीसाठी दाखल झालेला सर्वसामान्य कामगार वर्ग येथे मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. शहरात जवळपास ७५ झोपडपट्ट्या आहेत. तर, तळवडे, वाकड, हिंजवडी भागात आयटी कंपन्या आहेत. या भागांत उच्चभ्रू गृहनिर्माण सोसायट्या आहेत. मोठमोठे टॉवर उभे राहिले आहेत.

झोपडपट्टीसारख्या ठिकाणी मोलमजुरीसाठी सकाळीच आई-वडील घराबाहेर पडतात. त्यामुळे त्यांचे मुलांकडे दुर्लक्ष होते. काही मुले शिक्षणापासून वंचित राहतात. तर, काही शिक्षण अर्धवट सोडतात. मुले लहान वयातच वाममार्गाला लागणे, हा याचा परिणाम. उच्चभ्रू सोसायट्यांमध्येही आई-वडील दोघेही नोकरी करतात. मात्र, त्यांची मुले एक तर पाळणाघरात असतात किंवा त्यांच्यासाठी खास काळजी घेणारा (केअर टेकर) नियुक्त केलेला असतो. मात्र, अती लाडामुळे या मुलांमध्ये त्वरित राग येणे आणि हिंसक वृत्ती वाढीस लागल्याचे निरीक्षण आहे. याच्या परिणामीही त्यांच्या हातून गुन्हे घडत असल्याचे दिसते.

Pimpri : पिंपरीतील तीन रुग्णालयांमध्ये बॉम्ब ठेवल्याचा ई- मेल

भोसरीतील शांतीनगर येथे धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून सहा अल्पवयीन मुलांनी मिळून तरुण उद्योजकाच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारून त्याचा खून केला. पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. त्यातही अल्पवयीनांचा मोठा सहभाग आहे. मध्यंतरी चिंचवड-लिंकरोड येथील पत्राशेड परिसरात दोन अल्पवयीन मुलांसह चौघेजण मद्यपान करत होते. त्यांच्यात वाद झाल्याने त्यांनी राग काढण्यासाठी थेट परिसरातील पाच दुचाकी आणि दोन मोटारींवर दगड घालून त्यांची तोडफोड केली. निगडीत वाढदिवस साजरा झाल्यानंतर काही मोठे कारण नसताना १८ वाहनांची तोडफोड करण्यात आली.

तोडफोडीच्या अशा बहुतांश घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. गुन्हेगारी विश्वाचे आकर्षण आणि परिसरात स्वतःची दहशत निर्माण करणे, हा त्यांचा यामागे उद्देश असल्याचे समोर येत आहे. खून, खुनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड अशा अनेक प्रकरणांमध्ये अल्पवयीनांचा सहभाग दिसून येतो. अशा गुन्ह्यांपैकी ९९ टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश येते. मात्र, यातील अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग ही चिंतेची बाब आहे. अल्पवयीनांचा गुन्ह्यातील सहभाग रोखण्यासाठी पोलिसांकडूनही मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतु, या वाढत्या बालगुन्हेगारीला आळा कसा घालायचा, हा प्रश्न पोलिसांपुढे दिवसेंदिवस डोकेदुखी ठरत आहे.

पोलिसांकडून समुपदेशन

अल्पवयीन गुन्हेगारांमध्ये सध्या पहिल्यांदाच गुन्हा केलेल्यांचा समावेश जास्त आहे. रागाच्या भरात किंवा इतर कारणांमुळे त्यांच्याकडून गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडले आहेत. त्यांच्याकडून पुन्हा गुन्हा घडू नये यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. अल्पवयीन मुलांचा विविध गुन्ह्यांमध्ये समावेश वाढत असल्याने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय स्तरावर त्यासाठी स्वतंत्र पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. गुन्हेगारी क्षेत्राकडे वळणाऱ्या या मुलांचे समुपदेशन केले जाते. तसेच, शिक्षणासह रोजगार उपलब्ध होण्यासाठी व्यवसाय प्रशिक्षणही देण्यात येत आहे. करिअरबाबत त्यांना मार्गदर्शनही केले जात आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply