Pune : कसब्यात रवींद्र धंगेकरांचा मोठा विजय; 13 वर्षांच्या वनवासानंतर कॉंग्रेस भवनात उधळला गुलाल

पुणे : पुण्यातील काँग्रेस भवन हे पक्षाच्या लाखो कार्यकर्त्यांसाठी स्फुर्तीस्थान आहे. २००९ पूर्वी या काँग्रेस भवनाच्या परिसरात निवडणुकीत विजयाचा गुलाल मुक्तपणे उधळला जात होता. मात्र, त्यानंतर या काँग्रेस भवन परिसरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना गुलाल उधळण्याची संधीच मिळाली नाही. त्यानंतर तब्बल १३ वर्षांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. त्यामुळे काँग्रेस भवनाच्या परिसरात पक्षाच्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा गुलाल उधळण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. 

काँग्रेसच्या भवनाला एतेहासिक पार्श्वभूमी आहे. २००९ च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे रमेश बागवे हे पार्वती मतदारसंघातून विजयी झाले होते. तर विनायक निम्हण हेदेखील शिवाजीनगर मतदारसंघातून विजयी झाले होते. या दोघांच्या विजयाचा जल्लोष जंगी झाला होता. गुलालाची मुक्तहस्ते उधळणही करण्यात आली होती.

तसेच रमेश बागवे यांच्या गळ्यात गृहराज्यमंत्री पदाची माळही पडली. त्यानंतर झालेल्या २०१४, २०१९ या विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीमध्ये शहरातील काँग्रेसचे उमेदवार निवडून आले नाहीत.

पुणे महापालिका निवडणुकीतही काँग्रेसच्या उमेदवारांच्या विजयाचे प्रमाण घटले. २००७ मध्ये ४६, त्यानंतर २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत २८ तर २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे केवळ ९ उमेदवार जिंकले होते.

२०१२ मध्ये काँग्रेसला उपमहापौरपद मिळालं होतं. या निवडणुका वगळता काँग्रेस भवनावमध्ये विजयाचा मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्याची संधी २००९ नंतर कार्यकर्त्यांना मिळाली नाही.

त्यानंतर अखेर काल २ मार्च रोजी रवींद्र धंगेकर यांच्या विजयाच्या निमित्ताने काँग्रेस भवनाच्या परिसरात कार्यकर्त्यांना गुलाल उधळण्याची संधी मिळाली. मुक्तहस्ते गुलाल उधळताना काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद ओसांडून वाहताना दिसला.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply