Pune : आध्यात्म, वैश्विक तत्त्वज्ञान भारताला विश्वगुरू बनवेल - केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक

पुणे : 'आध्यात्म हीच भारताची खरी शक्ती होती. गेल्या काही वर्षांत तिची ओळख पुन्हा जनतेला होत आहे. या शक्तीचे संवर्धन करून आध्यात्म, वैश्विक तत्वज्ञान आणि संत-महात्त्म्यांचा आशिर्वाद हा भारताला विश्वगुरू बनवण्याचे स्वप्न साकार करेल,' असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.

साधू-संत, महंतांच्या सान्निध्याने वातावरण आध्यात्मिक व भक्तिमय झाले होते. महामंडलेश्वर शिवानंद महाराज प्रतिष्ठान व मातोश्री विजयाताई नाईक सामाजिक फाउंडेशनच्या पुढाकारातून पुण्यात आयोजित साधू-संत-महंत संमेलन व दर्शन सोहळ्यात नाईक बोलत होते.

गंगाधाम चौकातील वर्धमान सांस्कृतिक भवनमध्ये रविवारी (ता. ५) आयोजित या संमेलनास हरियाणा येथील महंत कालिदास महाराज, पंचदशनाम जुना आखाड्याचे महामंत्री अशोक महाराज, हरिद्वार येथील महामंडलेश्वर प्रेमगिरी महाराज,

हरिगिरी महाराज, किन्नर जुना आखाड्याच्या महामंडलेश्वर दीपा राजमाने (जगवाली), महामंडलेश्वर शिवानंद महाराज यांच्यासह अनेक मठाधिपती, नागा साधू उपस्थित होते. याप्रसंगी उद्योजक फत्तेचंद रांका, माजी नगरसेवक श्रीनाथ भीमाले, डॉ. राजेंद्र खेडेकर, अनिल गायकवाड आदींची उपस्थिती होती.

नाईक म्हणाले, 'संतांच्या आशिर्वादांमुळे सत्य आणि नीतीमत्तेच्या मार्गावर चालत राहिलेला हा देश सातत्याने प्रगतिपथावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या राजकारणाला नवी दिशा देत आहेत. साधू-संतांचे आशीर्वाद व मार्गदर्शन त्यांना लाभत आहे. साधू-संतांच्या मार्गदर्शनात आपल्या जीवनाचे समाधान, विश्वाचे कल्याण होणार आहे.'

कालिदास महाराज म्हणाले, 'काही वर्षांपूर्वीपर्यंत श्रीराम मंदिराचा मुद्दा वादात होता. तो प्रश्न पंतप्रधान मोदी यांनी कौशल्याने मार्गी लावला. गंगा स्वच्छता अभियान चांगल्या पद्धतीने राबविले जात आहे.

आता केंद्र सरकारने गोवंश संरक्षण आणि संवर्धनावर लक्ष्य केंद्रित केले पाहिजे. गोवंश असेल तर देश टिकेल आणि गोवंश असेल तर भारताला वैश्विक महाशक्ती होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. युवा पिढीने सद्सद्विवेकबुद्धीने काम करावे.'

संमेलनात विश्वशांती महायज्ञ, सुंदरकांडाचे प्रस्तुतीकरण, भजन व प्रवचन, भंडारा, गोमाता पूजन करण्यात आले. मातोश्री विजयाताई नाईक सामाजिक राष्ट्रीय फाउंडेशनचे लोकार्पण व संकेतस्थळाचे उद्घाटन झाले. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी अतुल नरहरी भोसले, राहुल गोसावी मित्र परिवार, महामंडलेश्वर शिवानंद महाराज प्रतिष्ठान, सर्वात्मक महारुद्र परिवार, मैत्री प्रतिष्ठान, शिवाजी करंजुले, नंदकिशोर शहाडे, ललित तींडे, भरत मिसाळ, डॉ. इंद्रजित यादव, ऍड. महेंद्र दलालकर यांनी परिश्रम घेतले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply