“आमच्यावर दबाव…”, प्रज्ज्वल रेवण्णा सेक्स स्कँडल प्रकरणातील महिलांचा वेगळाच दावा

  Prajwal Revanna : कर्नाटकमधील हासन लोकसभेचे खासदार आणि जेडीएस पक्षाचे नेते प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या कथित सेक्स स्कँडल प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणात लक्ष घातले असून गुरुवारी आयोगातर्फे एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले, ज्यात कर्नाटकच्या काँग्रेस सरकारवर आरोप पीडित महिलांनी आरोप केल्याचे म्हटले आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने सांगितले की, या प्रकरणातील एका पीडित महिलेने तिच्यावर खोटी तक्रार दाखल करण्यासाठी दबाव टाकल्याचे म्हटले आहे. खोटी तक्रार दाखल न केल्यास वेश्या व्यवसायाच्या प्रकरणात अडकवू अशी धमकी या महिलेला देण्यात आली असल्याचेही राष्ट्रीय महिला आयोगाने सांगितले.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या या निवेदनानंतर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष एचडी कुमारस्वामी यांनीही गुरुवारी राज्य सरकारच्या स्थापन केलेल्या विशेष तपास पथकावर (SIT) टीका केली. महिलांनी खोट्या तक्रारी दाखल कराव्यात यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी पीडित महिलांना धमकावले असून त्यांना काँग्रेस सरकारच्या बाजूने तक्रार दाखल करण्यास भाग पाडले आहे. अशी तक्रार दाखल न केल्यास त्यांच्यावर वेश्याव्यवसायाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आली आहे.

Sanjay Raut : “उद्धव ठाकरे नकली संतान”, पंतप्रधान मोदींच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; म्हणाले, “अत्यंत दळभद्री

हासन लोकसभेच्या खासदाराचे सेक्स व्हिडीओ प्रकरण हे जगातील सर्वात मोठे सेक्स स्कँडल आहे, अशी टीका कर्नाटकचे महसूल मंत्री कृष्णा गौडा यांनी केले होते. या टीकेचा समाचार घेताना एचडी कुमारस्वामी म्हणाले की, एसआयटीचे अधिकारी पीडितांच्या घरी जाऊन त्यांना धमकावत आहेत. एसआयटीचे अधिकारी खोट्या धमक्या देऊन पीडितांना तक्रार करण्यास भाग पाडत नाहीत का? अशाप्रकारे कोणत्या खटल्याचा तपास केला जातो का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

“अपहरण झालेल्या पीडित महिलेले तुम्ही कुठे ठेवले आहे? तिला न्यायालयासमोर का सादर करण्यात आलेले नाही? पीडित महिलांचे खासगी व्हिडीओ व्हायरल करण्याच्या कृत्याचे तुम्ही समर्थन करता का? असेही प्रश्न कुमारस्वामी यांनी उपस्थित केले आहेत.

रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली असताना त्यांना प्रज्ज्वल रेवण्णा प्रकरणाविषयी विचारण्यात आले असता, प्रज्वल रेवण्णा सारख्या लोकांविरोधात Zero Tolerance चे धोरण अवलंबले पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. पुढे बोलताना त्यांनी हे व्हिडिओ बाहेर येण्याच्या वेळेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हे व्हिडीओ एका दिवसात रेकॉर्ड केले गेले नाहीत. हे व्हिडीओ रेकॉर्ड झाले, तेव्हा जेडीएसची काँग्रेसबरोबर युती होती. विशेष म्हणजे कर्नाटकमध्ये मतदान झाल्यानंतर हे व्हिडीओ जाणीवपूर्वक बाहेर आणले गेले, असे ते म्हणाले.

प्रकरण काय आहे?

कर्नाटकमधील होलनरसीपुरातले भाजपाचे नेता देवराज गौडा यांनी बी. वाय. विजयेंद्र यांना एक पत्र लिहिले होते. ज्या पत्रात प्रज्ज्वल रेवण्णा आणि एच.डी. देवेगौडा यांच्या कुटुंबातील अनेक नेत्यांवर गंभीर आरोप करण्यात आले. देवराज यांचे म्हणणे आहे की, त्यांच्याकडे जो पेनड्राईव्ह आहेत त्यात २९७६ अश्लील व्हिडीओ आहेत. या व्हिडीओंमधल्या काही महिला सरकारी कर्मचारी असल्याचाही दावा करण्यात आला आहे. महिलांचे लैंगिक शोषण सुरु ठेवण्यासाठी त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी या व्हिडीओंचा वापर केला जातो असेही देवराज यांनी म्हटले. तसेच भाजपाचे नेते देवराज यांनी हे म्हटले आहे की, पेनड्राईव्ह मधले काही फोटो आणि व्हिडीओ असे आहेत जे काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांकडेही गेले होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply