PMC Recruitment : पुणे महापालिकेत भरतीसाठी परीक्षा; जून, जुलैमध्ये प्रक्रिया; ३२० जागांसाठी १० हजार अर्ज

पुणे : पुणे महापालिकेने वर्ग एक ते तीनमधील रिक्तपदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ३२० जागांसाठी १० हजार १७१ अर्ज प्राप्त झाले आहेत. या पदांसाठी २२ जून आणि ५ जुलै या रोजी ऑनलाइन परीक्षा होणार आहेत. उमेदवारांना परीक्षेच्या सात दिवस आधी प्रवेशपत्र उपलब्ध केले जातील, असे महापालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

पुणे महापालिकेने गेल्यावर्षी ४४८ रिक्त जागांची भरती केली होती. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्‍यात ३२० पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी सहा मार्च ते ३० एप्रिल दरम्यान अर्ज मागवले होते. या पदभरतीमध्ये आरोग्य विभाग, अग्निशामक विभागातील रिक्त पदे भरण्यावर भर देण्यात आला आहे.

२२ जून रोजी क्ष किरण तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, उप संचालक (प्राणी संग्रहालय), कनिष्ठ अभियंता (विद्युत), अग्निशामक विमोचन या पदांसाठी परीक्षा होईल. दोन जून रोजी आरोग्य निरीक्षक, वाहन निरीक्षक, पशु वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता आणि वरिष्ठ आरोग्य निरीक्षक या पदांसाठी परीक्षा होईल.

या ऑनलाइन परीक्षा तीन सत्रात होतील. परीक्षेच्या किमान सात दिवस आधी एसएमएस किंवा इ-मेलद्वारे युजर आयडी व पासवर्ड पाठवला जाईल. त्याद्वारे उमेदवार परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील, असे सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी सांगितले.

औषधनिर्माता पदासाठी सर्वाधिक स्पर्धा

महापालिकेकडे आलेल्या अर्जांमध्ये सर्वाधिक स्पर्धा औषध निर्मातापदासाठी असल्याचे स्पष्ट होत आहे. औषध निर्माता पदाच्या १५ जागांसाठी ३ हजार ३२ अर्ज आले आहेत. अग्निशामक विमोचन पदाच्या २०० जागांसाठी ३ हजार ५५५ अर्ज केले आहेत. कनिष्ठ अभियंता (विद्युत) १० जागांसाठी १ हजार ६७७, वाहन निरीक्षकाच्या तीन जागांसाठी २१६ उमेदवारांचे अर्ज आले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply