Pakistani Nationals Pune : पुण्यात १११ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास! फक्त तीन नागरिकांनी भारत सोडला

Pune : व्हिसावर भारतामध्ये आलेल्या १११ पाकिस्तानी नागरिकांचे सध्या पुण्यामध्ये वास्तव्य आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने घेतलेल्या कठोर निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील या नागरिकांची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. भारतात व्हिसावर आलेल्या या नागरिकांमध्ये मुस्लिम, सिंधी आणि हिंदू समाजाच्या व्यक्तींचा समावेश आहे.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ निरपराध भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर देशभरामध्ये संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत भारतामध्ये वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांच्या आत देश सोडण्याचा आदेश दिला आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सध्या एकूण १११ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास आहेत. ५६ महिला आणि ३५ पुरुष दीर्घकालीन व्हिसावर भारतात आले आहेत, अशी माहिती विशेष पोलीस शाखेकडून देण्यात आली.

Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्यानंतर मोठी कारवाई, संशयित दहशतवादी आसिफ-आदिलचे घर उद्ध्वस्त

विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते म्हणाले, ‘केंद्र सरकारच्या आदेशानंतर शहरातील सर्व पाकिस्तानी नागरिकांची माहिती संकलित करण्यात येत असून, त्यांच्याकडे असलेल्या व्हिसा आणि इतर कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. केंद्र सरकारच्या घोषणेनंतर आतापर्यंत तीन पाकिस्तानी नागरिकांनी पुणे पोलिसांच्या परकीय नागरिक नोंदणी कार्यालयाकडून (एफआरओ) ‘एक्झिट’ प्रमाणपत्र घेतले असून, लवकरच ते भारत सोडून जाणार आहेत. उर्वरित नागरिकांच्याही परतीच्या प्रक्रियेला गती देण्यात येणार आहे.’ दरम्यान, कोणत्याही अनुचित प्रकाराला आळा बसावा आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून, परकीय नागरिकांशी संबंधित सर्व घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत देश सोडून जावे, असा आदेश केंद्र सरकारने दिला आहे. मात्र, अद्याप स्थानिक पोलिसांना त्या अनुषंगाने कोणताही आदेश प्राप्त झालेला नाही. आदेश प्राप्त होताच त्यानुसार तातडीने कार्यवाही करण्यात येईल. रंजनकुमार शर्मा, पोलीस सहआयुक्त

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply