Nitin Desai Death: सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाईंनी संपवलं जीवन, एन.डी स्टुडिओमध्ये केली आत्महत्या

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केली आहे. कर्जतच्या एन.डी स्टुडिओमध्ये (N D Studio) त्यांनी गळफास लावून आपलं जीवन संपवलं आहे. नितीन देसाई यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं यामागचे कारण अद्याप समोर आलं नाही. नितीन देसाई यांच्या आत्महत्येमुळे  एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नितीन देसाई यांनी त्यांच्याच मालकिच्या एन. डी स्टुडिओमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. या स्टुडिओमध्ये काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना नितीन देसाई गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आले. घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ याबद्दल पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलिसांकडून तपास सुरु आहे.

नितीन देसाई यांनी २००५ मध्ये कर्जत येथे ५२ एकर जागेत एनडी स्टुडिओ सुरु केला आहे. याच स्टुडिओमध्ये त्यांनी आत्महत्या केल्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला आहे. नितीन देसाई हे खूपच नावाजलेले नाव आहे. अनेक हिंदी चित्रपटांसह कार्यक्रमांसाठी मोठ-मोठे सेट उभारणारे कलादिग्दर्शन म्हणून त्यांची ओळख होती.

नितीन देसाई यांनी मुंबईतल्या सर जे.जे.कला महाविद्यालयातून प्रकाशचित्रणाचे प्रशिक्षण घेतले होते. १९८७ साली त्यांनी चित्रपटसृष्टीत एन्ट्री केली. '१९४२ ए लव्ह स्टोरी' या चित्रपटामुळे ते प्रसिद्ध झाले. या चित्रपटामुळेच खऱ्या अर्थाने त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. त्यानंतर त्यांनी 'हम दिल दे चुके सनम', 'देवदास', 'लगान', 'जोधा अकबर', 'प्रेम रतन धन पायो' यासारख्या बॉलिवूड चित्रपटांचे कला दिग्दर्शनाचे काम केले होते.

नितीन देसाई यांनी आपल्या कारकिर्दीत बॉलिवूडच्या बड्या दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. त्यांनी आपल्या जबरदस्त कामाची छाप कायम पाडली. त्यांना आतापर्यंत ४ वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी 'राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' मिळवला आहे. तर तीन वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा 'फिल्मफेअर पुरस्कार' मिळवला आहे. नितीन देसाई यांच्या जाण्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा परसरली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply