Nashik MLC Result : नाशिकमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का; सत्यजित तांबेंचा विजय, शुभांगी पाटील पराभूत

Nashik MLC Result : नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. निवडणुकीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी विजय मिळवला असून महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. काँग्रेसमधून बंड करत सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीवर लागून होतं. 

या निवडणुकीत आपलाच विजय होईल, असं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून तसेच उमेदवार शुभांगी पाटील यांच्याकडून वारंवार सांगण्यात येत होतं. मात्र, निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव केला आहे. सत्यजित तांबे यांनी पाचव्या फेरीअखेर एकूण ६८ हजार ९९९ मतं मिळवली आहे. तर शुभांगी पाटील यांना केवळ ३९ हजार ५३४ मतांवर समाधान मानावं लागलं आहे. त्यांचा तब्बल २९ हजार ४६५ मतांनी पराभव झाला आहे.

दरम्यान, सत्यजित तांबे हे विजयी होताच, त्यांची कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष केला. दुसरीकडे तांबे यांचे कुटुंबीय देखील नाशिकच्या सय्यद पिंपरी येथील मतमोजणी केंद्रावर दाखल झाले आहेत. सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे यांनी मतदारांचे आभार मानले आहे. नाशिकमध्ये सत्यजित तांबे यांच्या विजयाने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

कारण, बऱ्याच दिवसांपासून ताब्यात असलेली विधानपरिषदेची जागा काँग्रेसने गमावली आहे. दरम्यान, आज सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी सुरू झाल्यानंतर सत्यजित तांबे हे नॉट रिचेबल झाले होते. मात्र, त्यांचे अत्यंत जवळचे मित्र मानस पगार यांचे अपघाती निधन झाल्याने तांबे हे त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी मानस यांच्या घरी गेले होते.

यावेळी माध्यमांसोबत संवाद साधताना, आपण विजयाच्या अगदी जवळ आहोत, पण विजयोत्सव साजरा करणार नाही, असं सांगितलं. माझा मित्र मानस पगार आज आपल्यातून गेलाय. त्यामुळे कोणताही आनंदोत्सव साजरा करणार नाही. सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे, कृपया संयम राखावा. मी ३ ते ७ फेब्रुवारीला संगमनेर येथे सर्वांना भेटणार आहे. कुणीही घाई करू नये, असं आवाहन तांबे यांनी कार्यकर्त्यांना केलं होतं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply