Muralidhar Mohol : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला तुकाराम महाराजांचे नाव द्यावे; मोहोळ यांचा सरकारकडे प्रस्ताव

Pune : ‘हवाई दलाच्या अखत्यारीत असलेल्या लोहगाव येथील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे नाव देण्यात यावे. त्यासाठी राज्य सरकारने प्रस्ताव तयार करून केंद्र सरकारकडे पाठवावा,’ अशी मागणी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राज्य सरकारकडे रविवारी केली.

मोहोळ यांनी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. त्यावर राज्य सरकार सकारात्मक असून, लवकरच हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्याचे आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिले आहे. हा प्रस्ताव आल्यावर केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.

Pune : कृषीच्या २५८ जागांच्या मागणीपत्राची एमपीएससीकडून परतपाठवणी

लोहगाव येथील पुणे विमानतळ हा हवाई दलाचा एक महत्त्वाचा वाहतूक तळ आहे. देशातील सर्वांत व्यग्र विमानतळांपैकी एक म्हणून लोहगाव विमानतळ ओळखला जातो. परंतु, हवाई दलाच्या अखत्यारीत असलेल्या या विमानतळाच्या धावपट्टीचे पुरेसे विस्तारीकरण झाले नसल्याने त्यावरून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर विमानसेवांना मर्यादा आहेत. त्यामुळे पुण्यासाठी स्वतंत्र आंतरराष्ट्रीय विमानतळ असावे, अशी आग्रही मागणी पुणेकरांकडून सातत्याने होत आहे. पुरंदर परिसरात छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्याची तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा अद्याप पूर्ण झालेली नाही.

या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन खासदार मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहे. त्या जोडीला आता लोहगाव विमानतळाला जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे नाव देण्यासाठी मोहोळ यांनी पुढाकार घेतला आहे. विमानतळाचे नामकरण करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे येत असतो. त्यामध्ये राज्य सरकार विमानतळाचे नाव प्रस्तावित करते. त्यानंतर केंद्राकडून नामांतरावर शिक्कामोर्तब होते. त्यामुळे पुण्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने राज्य सरकारकडे ही भूमिका मांडली, असे मोहोळ यांनी सांगितले.
पुण्याचे विमानतळ असलेल्या लोहगावमध्ये जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांचे आजोळ होते. त्यामुळे लोहगाव आणि तुकोबारायांचे नाते जिव्हाळ्याचे होते. लोहगावच्या गावकऱ्यांचीही आपल्या भूमिकेप्रमाणेच इच्छा असून, महाराष्ट्रातील तमाम वारकरी संप्रदायाचीही संवेदना या विषयाशी जोडलेली आहे. त्यामुळे लोहगावच्या विमानतळाला तुकोबारायांचे नाव देणे, हे अधिक समर्पक असणार आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply