Mumbai : घरोघरी तिरंगा मोहिमेसाठी सुमारे साडेतीन कोटी खर्च, महापालिकेच्या प्रत्येक विभागाला १२ लाख रुपये निधी देणार

Mumbai : यावर्षीही स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘घरोघरी तिरंगा’ ही मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेनिमित्त घरोघरी मोफत तिरंगा वाटप केले जाणार आहे. तसेच विभागांमध्ये तिरंगा यात्रा, तिरंगा दौड, सुशोभिकरण, रोषणाई करण्यात येणार असून या कामासाठी मुंबई महानगरपालिका तब्बल साडेतीन कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च करणार आहे. महापालिकेच्या २४ विभाग कार्यालयांना प्रत्येकी १२ लाख रुपये, शिक्षण विभागाला ५२ लाख रुपये आणि तिरंगा खरेदीसाठी वेगळा निधी खर्च केला जाणार आहे.

दोन वर्षांपूर्वी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारच्या निर्देशानुसार देशभरात ‘घरोघरी तिरंगा’ हे अभियान राबविण्यात आले होते. त्यावेळी राष्ट्रध्वजाचे मोफत वाटपही करण्यात आले होते. ते जपून ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले होते. आता यंदा केंद्र सरकारच्या निर्देशानुसार ‘घरोघरी तिरंगा’ हे अभियान एक वर्षाच्या खंडानंतर पुन्हा एकदा राबवण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेची यंत्रणा कामाला लागली आहे.

Pune : मनोज जरांगे-पाटील यांच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत बदल

या अभियानासाठी पालिकेने २० लाख झेंडे खरेदी केले असून ते घरोघरी वितरित केले जाणार आहेत. त्याकरीता पालिकेची विभाग कार्यालये शनिवार आणि रविवारीही खुली ठेवण्यात येणार आहेत. मुंबईत ३५ लाख निवासस्थाने आणि आस्थापना आहेत. त्याकरीता दोन वर्षांपूर्वी ५० लाख राष्ट्रध्वज खरेदी करण्यात आले होते. प्रत्येक घरी, प्रत्येक इमारत, सर्व शासकीय, निमशासकीय आस्थापना, खासगी आस्थापना, विविध संस्था, सहकारी संस्था यांच्या इमारतीवरही राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहेत. तसेच तिरंगी रोषणाई देखील केली जाणार आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ९ ते १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत देशभरात ‘हर घर तिरंगा’ अर्थात ‘घरोघरी तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. या कालावधीत मुंबईमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. तिरंगा यात्रा, तिरंगा रॅली, मानवंदना सोहळा, तिरंगा मेळा आदी उपक्रमांचा यामध्ये समावेश आहे. ९ ऑगस्ट २०२४ रोजी ऑगस्ट क्रांती मैदान येथे या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ सोहळा पार पडला. त्यानंतर मुंबईतील विविध प्रशासकीय विभागस्तरावर तिरंगा यात्रा, तसेच तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. महानगरपालिकेच्या सर्व २२७ प्रभागांमध्ये शनिवारी तिरंगा रॅली पार पडली. या रॅलीमध्ये महानगरपालिका शाळांमधील एकूण ६३ हजार विद्यार्थी आणि शिक्षकांनी सहभाग नोंदवला. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयुष गोयल यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, अधिकारी, नागरिक त्यात सहभागी झाले होते. घरोघरी तिरंगा हा उपक्रम स्वातंत्र्य दिनापर्यंत अर्थात १५ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. मुंबईकरांनी राष्ट्रभावनेने ‘घरोघरी तिरंगा’ अभियानात स्वयंस्फूर्तीने आणि उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, १३ ते १५ ऑगस्टदरम्यान आपापल्या घरी सन्मानपूर्वक राष्ट्रध्वज फडकवावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply