Mumbai : वरळीमध्ये आदित्य ठाकरेंचे शक्तिप्रदर्शन, शिवसेनेच्या नेत्यांसह हजारो शिवसैनिकांची गर्दी

Mumbai : विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले असून विविध राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख व आमदार आदित्य ठाकरे पुन्हा एकदा वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी वरळी मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन करीत गुरुवार, २४ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासह वडील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आई रश्मी ठाकरे, भाऊ तेजस ठाकरेही उपस्थित होते.

विधानसभेच्या २०१९ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आणि हा मतदारसंघ राजकीय वर्तुळात बहुचर्चित ठरला. वरळी विधानसभा मतदारसंघात मराठी मतदारांची संख्या अधिक आहे. आदित्य ठाकरे यांना आव्हान देण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी उत्सवांची संधी साधून, तसेच निरनिराळ्या उपक्रमांच्या माध्यमातून मराठी मतदारांना आकर्षित करण्यावर लक्ष केंद्रित केले होते. यंदा आदित्य ठाकरे पुन्हा एकदा वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. या पार्श्वभूमीवर लोअर परळमधील शिवसेना शाखा क्रमांक १९८ ते वरळी नाका परिसरातील मुंबई महानगरपालिकेच्या इंजिनीअरिंग हब दरम्यानच्या मार्गावर मिरवणूक काढून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

या मिरवणुकीसाठी ‘आपली वरळी, आपला आदित्य’ असा मजकूर, प्रमुख नेत्यांची छायाचित्रे व मशाल चिन्हाचा समावेश असलेली एक खास गाडी सजविण्यात आली होती. रखरखत्या उन्हातही नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते गळ्यात पक्षाचा शेला, डोक्यावर टोपी आणि हाती झेंडे, पक्षाचे नाव व चिन्ह असलेले फलक घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले होते. यामध्ये तरुणांसह महिला कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. बहुसंख्य पुरुष कार्यकर्त्यांनी भगवा शर्ट, सदरा, तर महिला शिवसैनिकांनी भगवी साडी परिधान केली होती.

Ratnagiri : चिपळूण-संगमेश्वर मधील राष्ट्रवादी विरुध्द राष्ट्रवादी लढतीत मुस्लीम मते निर्णायक ठरणार

ढोल ताशांच्या गजरात आणि कच्छी बाजाच्या तालावर कार्यकर्त्यांनी ठेकाही धरला. तर कोळी बांधवांनी पारंपरिक नृत्य सादर करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. ‘अरे आवाज कुणाचा ? शिवसेनेचा’, ‘ही ताकद कुणाची? शिवसेनेची’, ‘अरे कोण आला रे कोण आला ? शिवसेनेचा वाघ आला’, ‘शिवसेना जिंदाबाद’, ‘आपली निशाणी मशाल’ आदी विविध घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता. या मिरवणुकीदरम्यान लोअर परळ व वरळी परिसरातील विविध चाळी आणि इमारतींमधील नागरिक आदित्य ठाकरे यांची वाट पाहत उभे होते. आपापल्या चाळी आणि इमारतींसमोर मिरवणूक येताच आदित्य ठाकरे यांचे औक्षण करून त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात येत होती. एका चाळीजवळ वृद्ध आजीने ‘शिवसेना जिंदाबाद’च्या घोषणा देताना पाहिल्यावर आदित्य ठाकरे गाडीतून खाली उतरले आणि आजींची भेट घेऊन त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. हा क्षण आणि आदित्य ठाकरेंची छबी कॅमेरात टिपण्यासाठी नागरिक पुढे सरसावत होते. यावेळी काही प्रमाणात वाहतूक कोंडीही झाली होती, मात्र पोलिसांनी वाहनांना मार्ग मोकळा करून वाहतूक कोंडी सोडवली. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

वरळीमध्ये काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शिवसेनेचे प्रमुख नेते, पदाधिकारी, खासदार, आमदार, माजी नगरसेवक व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच महाविकास आघाडीतील कांग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते व पदाधिकारीही मिरवणुकीत सहभागी झाले होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply