Marathi Language : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा! राजकीय वर्तुळात रंगली श्रेयवादाची लढाई; राज ठाकरे म्हणाले, 'मी बिनशर्त पाठिंबा...'

Classical Language Status To Marathi : नवरात्रोत्सवाचा पहिलाच दिवस संपूर्ण महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक ठरला. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर राज्यभरात जल्लोष साजरा केला गेला. केंद्र सरकारच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळात जोरदार प्रतिक्रिया उमटत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ट्वीट करत पंतप्रधान मोदींचे आभार मानलेत. दुसरीकडे या निर्णयानंतर आता राजकीय नेत्यांमध्ये श्रेयवादाचीही लढाई रंगू लागल्याचे चित्र दिसत आहे.

CM शिंदे, फडणवीसांनी मानले आभार..

'अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला! एका लढ्याला यश आले. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सतत पाठपुरवठा केला होता. आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री श्री. गजेंद्रसिंह शेखावत यांचे आम्ही आभार मानतो. या कामात अनेक मराठी भाषक, विचारवंत, भाषेचे अभ्यासक, साहित्यिक आणि समीक्षकांचे साह्य झाले. त्यांचेही मन:पूर्वक आभार,' असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Classical Language Status : अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय? निर्णयाने काय होणार फायदा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

''आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. मी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्र्यांचे महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो. हा दिवस उजाडावा, यासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आताही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात सातत्याने पाठपुरावा केला,' अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

राज ठाकरेंची प्रतिक्रिया काय?

आजच्या घटस्थापनेच्या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. याबद्दल सर्वप्रथम महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या बाहेर पसरलेल्या तमाम मराठी जनांचं अतिशय मनापासून अभिनंदन. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा ही मागणी मी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात, श्री. नरेंद्र मोदी यांच्यासमोर मी केली होती.

तेंव्हा श्री. नरेंद्र मोदी हे २०२४ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. त्या सभेत श्री. नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान व्हावेत यासाठी जो पाठींबा मी दिला होता, त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख मागण्यांपैकी एक मागणी ही 'मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायलाच हवा' ही होती.

माझा पाठींबा बिनशर्त आहे असं मी स्पष्टपणे सांगितलं होतं. अर्थात बिनशर्त म्हणजे माझ्या पक्षाला हे द्या ते द्या यापेक्षा माझ्या राज्यासाठी, माझ्या भाषेसाठी काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. त्यातल्या एका मागणीची आज पूर्तता झाली. याबद्दल पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि तमाम केंद्रीय मंत्रिमंडळाचे देखील खूप आभार, असे ट्वीट राज ठाकरे यांनी केले आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply