Maratha Kranti Morcha : आक्रमक, पंढरपूरात सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन; 'आरक्षण दिले तरच मुख्यमंत्र्यांना यंदाची आषाढीची महापूजा करू देणार'

Maratha Reservation : मराठा आरक्षणाची पुनर्विचार याचिका सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर राज्यभरातील मराठी क्रांती माेर्चाचे समन्वयक शिंदे-फडणवीस सरकारविषयी तीव्र नाराजी व्यक्त करु लागले आहेत. नवी मुंबईतील समन्वयकांनी काॅंग्रेसचे नेते अशाेक चव्हाण यांना यासाठी जबाबदार धरले आहे. दूसरीकडे मराठा समाजाला आरक्षण दिले तरच मुख्यमंत्र्यांना यंदाची आषाढीची महापूजा करू देणार अन्यथा नाही असा इशारा पंढपरपूरातून मराठी क्रांती माेर्चाने दिला आहे. 

मराठा आरक्षणाबाबत शिंदे-फडणवीस सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. मराठा आरक्षण पुर्नविचार याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने नुकताच नकार दिला.

सन २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निकाल दिला होता. त्याविरोधात याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. या याचिकेत ५०टक्के आरक्षणाची मर्यादा ठरवणाऱ्या निकालाला आव्हान देण्यात आले होते.

तसेच मागासवर्गीय आयोगाच्या अहवालावर पुनर्विचार करण्याची मागणीही या याचिकेत करण्यात आली होती. विनोद पाटील यांच्यापाठोपाठ राज्य सरकारने देखील मराठा आरक्षणावर पुनर्विचार याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळली.

यामुळे शिंदे-फडणवीस सरकारने शुक्रवारी तातडीने एक बैठक घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथिगृह येथे मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ बैठक झाली. या बैठकीत मराठा आरक्षणासाठी क्युरेटिव याचिका दाखल करण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच आठवडयातल्या दर मंगळवारी मराठा उपसमितीची बैठक सक्तीने घेणार असल्याची माहिती मंत्री शंभूराजे देसाई यांनी स्पष्ट केले.

पंढरपूरात शिंदे फडणवीस सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाज आरक्षण पूनर्विचार याचिका फेटाळल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. आज पंढरपुरात मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा समाजाच्या वतीने शिंदे फडणवीस सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध केला.

यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड म्हणाले सत्तेत आल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देऊ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते. आता सत्तेत आल्यानंतर ही आरक्षण मिळाले नाही. सरकार समाजाला आरक्षण देण्यास उत्सुक नाही. अशात न्यायालयाने याचिका फेटाळली आहे. याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे असे समन्वयकांनी नमूद केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीच्या पूर्वी मराठा समाजाला आरक्षण देवून विठ्ठलाच्या महापूजेसाठी यावे अन्यथा आषाढीच्या महापूजे पासून मुख्यमंत्र्यांना रोखू असा इशारा ही रामभाऊ गायकवाड यांनी दिला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply