Maharashtra Politics : महाराष्ट्रात काहीही होऊ शकतं! आता जे होईल त्याला समोर जाण्याची लोकांनी तयारी ठेवावी - नीलम गोऱ्हे

Maharashtra Politics : गेल्या काही दिवसांपासून राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यात मोठी उलथापालथ होऊ शकते अशा चर्चा सुरू आहे. काही नेत्यांनी तर राज्यात येत्या १५ दिवसांत मोठा भूकंप होऊ शकतो असा दावा देखील केला आहे. यादरम्यानच आता विधान परिषदेच्या उपाध्यक्षा नीलम गोऱ्हे यांनी राज्यात आगामी काळात काहीही होऊ शकतं असं सूचक विधान केलं आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात पडद्यामागे नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जापान दौऱ्याहून परतल्यानंतर नीलम गोऱ्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना स्पष्ट उत्तरे दिली. विधानसभेचे अध्यक्ष लवकर आल्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना त्या म्हणाल्या, जपान दौऱ्यात सर्वपक्षीय लोक होते. नार्वेकर यांचा येण्याचा राजकीय घडामोडींशी संबंध नाही. त्यांनी आधीच सांगितलं होतं की ते लवकर जाणार आहेत, असे नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणचं काय होणार यावर मनाची तयारी झाली असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

राज्याच्या सत्तासंघर्षावरील कोर्टाच्या निर्णयाबाबत बोलताना त्या म्हणाल्या, कोर्टाच्या निकालाबाबत खूप अनिश्चितता आहेत. काहीही होऊ शकतं. कोर्ट अध्यक्षांकडे प्रकरण सोपवू शकतं किंवा निवडणूक येईपर्यंत ताखाच पडतील अशी एक शक्यता वर्तवली जात आहे. तसेच असं सुद्धा काही जणांचं म्हणणं की न्यायाधीशांना कोरोना झाला आहे, त्यामुळे निकाल लांबू शकतो. जुलैमध्ये अधिवेशन आहे, तोपर्यंत काहीही होऊ शकतं अशी शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली.

राज्यात राजकीय उलथापालथीच्या चर्चांवर बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या, कोणीही कुठेही जाऊ शकतं. राजकारणात काहीही घडू शकतं. निवडणूक आली की गमवण्यासारखं काही नाही हे लक्षात येतं. त्यामुळे काहीही घडू शकतं असे त्या म्हणाल्या.

यावेळी साम टीव्ही बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या, काही प्रश्नांची उत्तरं नियती आणि देव ठरवतो. अनेक शक्यता आहेत, ७-८ शक्यता आहेत. दूरगामी परिणामांचा विचार करून कधी उत्तर मिळेल? मिळणार आहे का हा महत्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात काहीही होऊ शकतं. लोकांनी आता जे काही होईल त्याला समोर जाण्याची तयारी ठेवणं हे क्रमप्राप्त आहे, असं मोठं विधान त्यांनी केले आहे. 

महाविकासआघाडीविषयी बोलताना त्या म्हणाल्या, शरद पवार आणि संजय राऊत महाविकासआघाडी निर्माण करणारे शिल्पकार आहेत. परिस्थितीनुसार आघाड्या निर्माण होतात, परिस्थिती बदलली की बदल होऊ शकतात. अमुक एका गेअरमध्ये गाडी चालवणार असं म्हणून शकत नाही. परिस्थिती आली की स्वत:ला सुरक्षित करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे, असे सूचक विधान देखील त्यांनी केले. 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply