Maharashtra Politics : लोकसभेसाठी शिंदे गटाचं ठरलं, ‘इतक्या’ जागांवर निवडणूक लढवणार; भाजपचं टेन्शन वाढणार?

Maharashtra Politics : लोकसभा निवडणूक २०२४ साठी आता फक्त काही महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक जागा निवडून आणण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे. मात्र, महाविकास आघाडी आणि महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. कुणाला किती जागा मिळणार? याचा पेच अद्यापही कायम आहे.

अशातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी (२६ फेब्रुवारी) संसदेच्या उभय सभागृहातील खासदारांची बैठक घेतली. या बैठकीत शिवसेनेने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत लढवण्यात आलेल्या २२ जागांचा आढावा घेण्यात आला.

Breaking News : अजित पवारांच्या कट्टर समर्थकाचा तडकाफडकी राजीनामा; राष्ट्रवादीत मोठी खळबळ

गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने २२ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी १८ जागांवर विजय मिळवला होता. आगामी लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेने १८ जागांवर उमेदवार द्यायला हवे, अशी आग्रही मागणी खासदारांकडून करण्यात आली. 

पक्षाचे खासदार असलेल्या जागा मित्र पक्षांसाठी सोडू नयेत, अशी भूमिकाही शिंदे गटाच्या खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडली. त्याचबरोबर जागावाटप लवकर निश्चित करावे, म्हणजे प्रचाराला सुरुवात करता येईल, असंही खासदारांनी यावेळी म्हटलं.

शिंदे गटाच्या या भूमिकेमुळे महायुतीतील जागावाटपाचा तिढा आणखीच वाढण्याची शक्यता आहे. कारण, भाजपने लोकसभा निवडणुकीत शिंदेला फक्त १३ जागाच सोडण्याची तयारी दर्शवल्याची माहिती आहे. त्यामुळे महायुतीतील जागावाटप हा कळीचा मुद्दा ठरू शकतो.

दरम्यान, लोकसभा निवडणूक प्रचारात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यकाळात घेण्यात आलेले निर्णय, समृद्धी महामार्ग, अटल सेतूसारख्या पायाभूत सोयीसुविधा असे मुद्देही प्रचारात मांडण्यात यावेत, यावरही एकमत झाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply