Maharashtra News : ऊस तोडणी कामगारांचा २५ डिसेंबरपासून ‘कोयता बंद’ करण्याचा इशारा

Maharashtra News : राज्यातील सर्व ऊसतोडणी कामगारांना तोडणीसाठी प्रति टन ४१० रुपये देण्यात देण्याची मागणी ऊस तोडणी कामगारांच्या सर्व संघटनांनी राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाकडे केली आहे. मात्र हा दर देण्यास साखर महासंघाने असमर्थता दर्शविली. त्यामुळे ही मागणी येत्या दहा दिवसांत पूर्तता करावी, अन्यथा येत्या २५ डिसेंबरपासून ‘कोयता बंद’ आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य ऊसतोड कामगार मुकादम व वाहतूक संघटनेच्या सर्व संघटनांनी गुरुवारी (ता.१४) पत्रकार परिषदेत बोलताना दिला आहे.

ऊसतोड कामगारांचा चालू ऊस गळीत हंगामातील ऊस तोडणी आणि भरणीसाठीच्या प्रचलित दरात ५५ टक्के वाढ करण्याची मागणी ऊसतोड कामगार संघटनांनी केली आहे. त्यांच्या या मागणीवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी आज साखर महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित कऱण्यात आली होती. या बैठकीत ऊसतोड कामगार संघटनांच्या मागणीवर एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे आजची ही बैठक फिसकटली.

राज्यातील ऊसतोडणी मजुरीचा प्रचलित दर सध्या २७३ रुपये १० पैसे इतका आहे. या दरात आणखी किमान ५५ टक्के वाढ करण्याची कामगार संघटनांची प्रमुख मागणी आहे. मात्र आजच्या बैठकीत तो ५५ टक्क्यांऐवजी ५० टक्के वाढ करून तो प्रति टन ४१० रुपये इतका करावा, अशी मागणी या संघटनांनी आजच्या बैठकीत बोलताना केली.

साखर संकुल येथील राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या कार्यालयात आज ऊस तोड कामगार संघटनांची आणि कारखाना महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत अंतिम निर्णय होऊ शकला नाही.

या बैठकीला राज्य सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि ऊसतोड कामगार संघटनांचे डॉ. डी. एल. कराड, दत्ता डहाके, सुखदेव सानप, प्रा. सुशीला मोराळे, दत्तात्रेय भांगे, गहिनीनाथ थोरे पाटील, संजय तिडके आदींसह विविध सात ऊसतोड कामगार संघटनांचे पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते. या बैठकीनंतर ऊसतोड कामगार संघटनांनी कोयता बंद आंदोलनाची घोषणा केली.

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply