Maharashtra Bhushan Award : शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहील; अप्पासाहेबांनी सर्वांना सांगितली भविष्याची वाटचाल

Appasaheb Dharmadhikari : ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नवी मुंबई येथील खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. त्यानंतर आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहील असे देखील अप्पासाहेबांनी सांगितले.

आजचा हा पुरस्कार माझ्या कार्याचा गौरव आहे, नानासाहेबांनी कष्ट केलं आणि तुम्ही साथ दिली, आजच्या या पुरस्काराचं संपूर्ण श्रेय तुम्हाला जातं. एका घरात दुसरा पुरस्कार देणं ही घटना महाराष्ट्रात आतापर्यंत कुठेही झाली नाही, असं आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी सांगितलं.

आम्ही कामाची सुरुवात ही खेडेगावापासून सुरु केली. मी प्रसिद्धीपासून लांब आहे. वस्तू महत्वाची असेल तर तिची जाहिरात करायची गरज काय आहे. मानवता धर्मात प्रत्येक मनुष्याने उभं रहावं. नानासाहेब वयाच्या 87 वर्षापर्यंत काम करत होते. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहील. माझ्यानंतर माझाा मुलगा हे कार्य पुढे नेईन. मला विश्वास आहे. सचिन धर्माधिकारी सुद्धा चांगले काम करेल, असंही धर्माधिकारी म्हणाले.

माझ्या आयुष्यातील हा भाग्याचा क्षण, पुरस्कार हा नेहमीच मोठा असतो,तो लहान कधीच नसतो. समाज आणि देशाचे आपल्यावर ऋण आहे, ते आपण फेडले पाहिजे. कोणत्याही प्रसिद्धीशिवाय मी हे काम करत आहे, त्यामुळे तुम्हीही कार्य करा असे देखील धर्माधिकारी यावेळी म्हणाले.

या पुरस्कार सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्रीअमित शाह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी हजेरी लावली होती. यासोबतच हा अभूतपूर्व सोहळा याची देही, याची डोळा पाहण्यासाठी लाखो अनुयायांनी उपस्थिती लावली होती.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *