Leopard Attack : जेवण केल्यानंतर हात धुण्यासाठी अंगणात गेली; चिमुकलीवर बिबट्याची झडप, रात्रीची थरारक घटना

Leopard Attack : रात्री आई- वडिलांसोबत जेवण केले. जेवण झाल्यानंतर चिमुकली उठली आणि अंगणात ठेवलेल्या टाकीजवळ हात धुण्यासाठी गेली. याच वेळी बिबट्याने हल्ला करत सात वर्षीय चिमुकलीला ओढत नेले. यात चिमुकलीचा मृत्यू झाल्याची थरारक घटना राहाता तालुक्यातील धनगरवाडी गावात घडली आहे. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

वन्य प्राण्यांचा वाडा वस्ती परिसरात वावर वाढला आहे. यातच अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून पाळीव प्राण्यांसह माणसांवर सातत्याने हल्ल्याच्या घटना घडत आहेत. राहाता तालुक्यातील धनगरवाडी येथे राशीनकर वस्तीवर असलेल्या परिवारासोबत आघात घडला आहे. बिबट्याने हल्ला केल्याने सात वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली.

हात धुवायला जाताच हल्ला

स्नेहल संतोष राशीनकर (वय ७) असे घटनेत मृत झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. स्नेहल हि रात्री ९ वाजेचा सुमारास जेवण केल्यानंतर घराच्या अंगणातील पाण्याच्या टाकीजवळ हात धुण्यासाठी गेली होती. मात्र याच वेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने तीच्यावर झडप मारली आणि तिला घरापासून काही अंतरावर फरफटत ओढत नेले. मुलीचा आवाज एकूण कुटुंबीय धावत बाहेर आले असता त्यांनी आरडाओरड केली.

आरडाओरडा केल्याने बिबट्याने ठोकली धूम

कुटुंबियांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने स्नेहलला तिथेच सोडून धूम ठोकली. मात्र हल्ल्यात स्नेहल हिच्या मानेला खोलवर जखम झाली होती. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने नरभक्षक बिबट्याला तातडीने जेरबंद करावे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply