KDMC News: केडीएमसी मधील २७ गावांचे प्रश्न निकाली निघणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत संघर्ष समितीची बैठक

KDMC News: कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका, मालमत्ता करात केलेली वाढ, ग्रोथ सेंटर रद्द करणे, आरोग्य व शिक्षण व्यवस्था या मागण्याबाबत संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी बैठक झाली.

या बैठकीत २७ गावामधील मालमत्ता कराबाबत दिलासा देण्यासाठी तत्काळ समिती गठित करून शासनाला अहवाल सादर करण्याच्या सूचना पालिका आयुक्तांना मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती संघर्ष समितीने आज पत्रकार परिषदेत दिली. तसेच मुख्यमंत्री शिंदे संघर्ष समितीच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे संघर्ष समितीने सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत सर्व पक्षीय संघर्ष समिती गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन करत आहेत. २७ गावांमध्ये मालमत्ता करात वाढ करण्यात आली आहे. २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करणे, ग्रोथ सेंटर रद्द करणे, भाल, भोपर गावातील डम्पिंग ग्राउंड रद्द करणे कल्याण शीळ रोड वरील बाधित शेतकऱ्यांना मोबदला देणे. आरोग्य व शिक्षण व्यवस्था सदृढ करणे, अशा काही मागण्या संघर्ष समितीकडून केल्या जात आहेत.

या मागण्यांसाठी संघर्ष समितीने केडीएमसी मुख्यालयावर धरणे आंदोलने केले होते. या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,खासदार श्रीकांत शिंदे, युवासेना पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांच्या सोबत संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत 27 गावातील मालमत्ता करा बाबत निर्णय घेण्यासाठी एक समिती गठीत करत तत्काळ अहवाल सादर करावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना केली.

27 गावाच्या स्वतंत्र नगरपालिकेबाबत न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. मात्र यादरम्यान २७ गावात रस्ते पाणी, आरोग्य सुविधा, शिक्षण या मूलभूत सुविधांबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच दिवा येथे आगरी कोळी वारकरी भवन, कल्याण शीळ रोडचे ह भ प संत सावळाराम महाराज नामकरण, संत सावळाराम महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात असल्याचे सांगितले.

 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply