Karnataka Election : अण्णा हजारेंकडून घेतली प्रेरणा; पदाचा राजीनामा देत न्यायाधीश उतरले थेट रिंगणात

Karnataka Assembly Election 2023 : मूळचे विजापूर जिल्ह्याच्या बसवण बागेवाडी तालुक्यातील संकदाळ गावचे असलेले सुभाषचंद्र राठोड यांनी आपल्या सात वर्षाच्या न्यायालयीन सेवेचा राजीनामा देत धजदमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनालाही नवी कलाटणी मिळाली आहे.

गुलबर्गा जिल्ह्यातील चित्तापूर राखीव विधानसभा मतदारसंघ त्यांनी निवडणुकीसाठी निवडला आहे. समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare), एस. आर. हिरेमठ, लोकायुक्त संतोष हेगडे यांच्यापासून प्रेरणा घेतलेले राठोड यांनी कायद्याचे शिक्षण घेत असतानाच ‘भ्रष्टाचारमुक्त आपला समाज’ ही संघटना स्थापन करीत भ्रष्टाचाराविरोधात लढा उभारला होता.

संकदाळ गावचे असलेले राठोड गरीब परिस्थितीतून वर आलेले आहेत. त्यांचे कुटुंब स्थलांतरित कामगाराचे कुटुंब होते. नंतर त्यांच्या वडिलांनी परिवहन विभागात चालक म्हणून सेवा बजाविली. सहा मुले असल्याने अनेक वेळा पोटापाण्याचा प्रश्नही निर्माण झाला, पण वडिलांनी मुलांच्या शिक्षणात कोणतीही कमतरता शिल्लक ठेवली नाही. सहा मुलांपैकी चार मुलांनी कायद्याची पदवी मिळविली असून वकील आणि न्यायाधीश म्हणून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

राठोड न्यायाधीश परीक्षा उत्तीर्ण

सुभाषचंद्र राठोड यांचे थोरले बंधू अनिल कुमार हे उच्च न्यायालयाच्या गुलबर्गा खंडपीठात न्यायाधीश आहेत. त्यांचे बंधू कुमार हे विजापूर तर सुनील हे बसवन बागेवाडी न्यायालयात न्यायाधीश आहेत. तर चौथे सुभाषचंद्र हे चित्तापूर न्यायालयात  न्यायाधीश होते.त्यांचे अन्य दोघे बंधू शेती करतात. तर आई कमलाबाई या संकदाळ ग्रामपंचायतीच्या सदस्या आहेत. कायद्याची पदवी मिळविल्यानंतर राठोड यांनी २०१६ मध्ये वकिली सुरु केली. ते करत असतानाच त्यांनी सिव्हिल कनिष्ठ श्रेणी न्यायाधीश परीक्षा उत्तीर्ण केली.

न्यायाधीश पदाचा राजीनामा

चित्तापूर न्यायालयात त्यांनी चार वर्ष सिव्हिल न्यायाधीश म्हणून सेवा बजाविल्यानंतर विजापूर, गदग येथील न्यायालयात न्यायाधीश पदावर काम केले. गदग येथून त्यांनी न्यायाधीश पदाचा राजीनामा दिला असून आपल्या सात वर्षाच्या कार्यकाळापैकी चार वर्ष सेवा बजाविलेल्या चित्तापूरमधूनच ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply