Kalyan : मोठ्या प्रकल्पांच्या घोषणांपेक्षा प्रस्तावित विकास कामे मार्गी लावण्यावर भर

Kalyan : महसुली उत्पन्न आणि शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाचा विचार करून पालिका प्रशासनाने नागरिकांना मोठ्या विकास प्रकल्पांचे देखावे न दाखविता, कोणत्याही नव्या विकास कामांच्या घोषणा न करता कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत सुरू असलेली प्रस्तावित विकास कामे मार्गी लावण्यावर भर देण्याचा विचार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केला आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्पातून कल्याण रेल्वे स्थानक भागातील ६५ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. ही कामे लवकर पूर्ण करून रेल्वे स्थानक परिसर वाहतूक कोंडी मुक्त करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. दुर्गाडी किल्ला खाडी किनारचे नौदल संग्रहालयाचे काम ऐशी टक्के पूर्ण झाले आहे.

कल्याण शहरातील वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी वालधुनी नदीला समांतर रस्ते, रेल्वे मार्गावर एक उड्डाण पूल उभारण्यात येणार आहे. या कामासाठी एमएमआरडीएने ६४२ कोटीच्या खर्चास मान्यता दिली आहे. हा पूल मुरबाड रस्ता, बदलापूर रस्ता, पुना जोड रस्ता यांना जोडणारा असेल. डोंबिवलीत विष्णुनगरमध्ये अद्ययावत मासळी बाजार, ब्राह्मण सभेसमोर सुतिकागृह, सामान्य आणि कर्करोग रुग्णालय विकसित करण्याची कार्यवाही सुरू आहे. सावळाराम महाराज क्रीडासंकुलात सुमारे ४० कोटी खर्चून अद्ययावत क्रीडाविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

हवा गुणवत्ता दर्जा सुधार योजनेतून पालिका हद्दीत ई बससेवा, धूळशमन यंत्र, औद्योगिक क्षेत्रात पर्यावरणपूरक स्मशानभूमी, पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. महिला व बालकांच्या सुरक्षितेचा विचार करून पोलिसांच्या दामिनी पथकाला १६ स्कुटर देण्यात येणार आहेत. पालिका क्षेत्रातील नोकरदार महिलांसाठी वसतीगृह, समुपदेशन केंद्र यासाठी १४ कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

पालिका शाळांमध्ये नाविन्यता आणण्यासाठी विनोबा भावे शिक्षक साहाय्यक उपक्रम राबविण्यात येत आहे. शाळांच्या सक्षमीकरणासाठी १९ कोटी, आदर्श शाळांसाठी आठ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. दिव्यांग कल्याण व पुनर्वसनसाठी १९ कोटी प्रस्तावित करण्यात आले आहेत. कल्याण डोंबिवली शहरातील कचरा निर्मूलनासाठी मे. सुमित इकोप्लास्ट या एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. या माध्यमातून स्वच्छतेचा चेन्नई पॅटर्न शहरात राबविण्यात येत आहे. धूळ शमन, अडगळीचा कचरा उचलण्यासाठी चार पाॅवर स्वीपर कार्यरत आहेत.

शहरातील ६७ रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यासाठी ७३० कोटी खर्च केले जाणार आहेत. रस्ते देखभालीसाठी ३० कोटी निधी प्रस्तावित आहे. ६५ उद्याने, १७ मैदानांची देखभाल खासगी ठेकेदार करणार आहे. यासाठी १७ कोटी तरतूद करण्यात आली आहे. सिटी पार्क, प्रबोधनकार ठाकरे स्मारकाचे परिचालन बाह्यस्त्रोत यंत्रणेतून करण्याचे नियोजन आहे. बारावे येथील भूखंडावर ऑटीझम व्हिलेज, किड झी सुविधा पुरविण्यात येणार आहे. कल्याण पूर्वेतील डाॅ. आंबेडकर स्मारकासाठी १६ कोटी ८५ लाखाची तरतूद आहे. यापैकी शासनाने नऊ कोटी उपलब्ध करून दिले आहेत.

पालिका हद्दीत आगरी कोळी भवन, वारकरी भवन, हिंदी भाषिक भवन, डाॅ. आनंदीबाई जोशी उद्यान विकसित करण्याचे नियोजन आहे. वीज बचतीसाठी सौर उर्जेवरील साधनांचा नागरिकांनी अधिक वापर करण्यासाठी विद्युत विभाग प्रयत्नशील आहे. या उपक्रमाबद्दल विद्युत विभागाचा दिल्ली येथे गौरव झाला.

नागरिक पालिकेच्या सुविधांचा ऑनलाईन माध्यमातून वापर करत आहेत. ही संगणकीय प्रणाली अधिक गतिमान, बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कल्याणमधील कैलास गार्डन येथे सर्वोपचारी रुग्णालय प्रस्तावित आहे. पालिका क्षेत्रात नऊ स्वयंचलित पध्दतीची स्वच्छतागृहे प्रस्तावित आहेत. लालचौकी, बैलबाजार, मुरबाड रोड, विठ्ठलवाडी, शिवमंदिर, पाथर्ली, कोळेगाव येथील आठ जुन्या स्मशानभूमी तोडून तेथे २० कोटी खर्चाच्या आरसीसी पध्दतीच्या स्मशानभूमी उभ्या केल्या जाणार आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply