Jejuri News : जेजुरी संस्थानच्या विश्वस्तपदाचा विषय अखेर मार्गी! ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश

 जेजुरी संस्थानमधील विश्वस्तपदांच्या नियुक्तीवरुन संघर्ष करावा लागल्यानंतर जेजुरीकरांच्या लढ्याला यश मिळालं आहे. धर्मादाय आयुक्तांनी आंदोलक ग्रामस्थांच्या मागणीवर सुनावणी घेतल्यानंतर नव्या विश्वस्त मंडळाला परवानगी दिली आहे.

विश्वस्त मंडळात स्थानिकांना डावलण्यात आल्याने स्थानिक खांदेकरी आणि नामकरी यांच्यावर अन्याय झाल्याची भावना स्थानिकांची आहे. त्यासाठी जेजुरीकरांनी आंदोलन पुकारलं होतं. एबीपी माझानं याबाबत वृत्त दिलं आहे.

नुकत्याच झालेल्या निर्णयानुसार, जेजुरी संस्थानच्या विश्वस्तपदी जेजुरीतील 6 ग्रामस्थ आणि बाहेरच्या 5 जणांची नियुक्ती होणार आहे. धर्मादाय आयुक्तांच्या सुनावणीत हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जेजुरीकरांचं याबाबत आंदोलन सुरु होतं.

धर्मादाय आयुक्तांकडं या संपुर्ण प्रकरणाची सुनावणी करण्यात आली. त्यानंतर यावर असा निर्णय घेण्यात आला की, एकूण विश्वस्तांपैकी ६ जण जेजुरी गावचे तर इतर ५ जण हे जेजुरी बाहेरचे असतील. धर्मादाय आयुक्तांच्या या निर्णयानंतर जेजरीकरांनी वाजतगाजत आनंद व्यक्त केला आहे.

दरम्यान, जेजुरी संस्थानचे विश्वस्त आणि ग्रामस्थ यांच्यातील वाद चिघळल्यानंतर यावर काहीतरी तोडगा निघावा यासाठी जेजुरीच्या ग्रामस्थांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. राज ठाकरे यांना हा मुद्दा पटवून देण्यात आला त्यानंतर त्यांनी याप्रकरणी सर्वतोपरी मदत करणार असल्याचं ग्रामस्थांना सांगितलं होतं.

याप्रकरणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून स्थानिकांना न्याय देण्याची ग्वाही त्यांनी राज ठाकरेंनी दिली होती. राज ठाकरे हा प्रश्न मार्गी लावतील अशी अपेक्षा जेजुरीच्या ग्रामस्थांनी व्यक्त केली होती. विश्वस्तांमध्ये चार लोकांची वाढ करण्यासाठी देखील ते प्रयत्न करणार आहेत, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply