IPL 2022 : पंत दोन ‘हेड’मास्तरांचे आव्हान कसं झेलतो?

मुंबई : दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत  सध्या आयपीएलच्या यंदाच्या हंगामासाठी सज्ज झालाय. त्याच्या नेतृत्वाखालील दिल्लीचा संघ पहिली वहिली ट्रॉफी उंचावण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. रिषभ पंत आंतरराष्ट्रीय स्तरावर एका बाजूला संयमी व्यक्तीमत्व असलेल्या राहुल द्रविड याच्याकडून धडे घेतोय. दुसऱ्या बाजूला फ्रेंचायझी क्रिकेटमध्ये त्याला आक्रमक रिकी पॉटिंगची शिकवण सुरु आहे. दोन अगदी वेगळ्या धाटणीच्या मार्गदर्शकांसदर्भात पंतने आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या आहेत. द्रविड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची धूरा सांभाळण्यापूर्वी द्रविड दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्याचाही भाग राहिला आहे. दुसरीकडे सध्याच्या घडीला पॉटिंग दिल्ली कॅपिटल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी आहे. वेगवेगळ्या स्तरावर पंतला या दोन दिग्गजांकडून धडे मिळत आहेत.

पंतने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाला की, 'मी नेहमी वेगवेगळ्या लोकांकडून काही तरी शिकण्यास उत्सुक असतो. दोघांची काम करण्याची पद्धती वेगळी आहे. काही गोष्टी मला राहुल सरांकडून शिकायला मिळतात. तर त्यापेक्षा काही वेगळ्या गोष्टी मी पॉटिंगकडून शिकतो. कोणत्या बाबतीत कोणाकडे जायचे हे आता कळलं आहे, असेही तो म्हणाला.

आदर्श खेळाडूकडून शिकायचं असतं. त्यांची नक्कल करायची नसते. मी नेहमी याच विचाराने एखाद्या गोष्टीकडे पाहतो. त्यामुळेच मी इथपर्यंत पोहचलो आहे. महेंद्र सिंह धोनी, एडम गिलख्रिस्ट, रिकी पॉटिंग आणि राहुल सर या सर्वांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. मी रवि भाईंकडूनही खूप काही शिकलो, असे म्हणत पंतने माजी भारतीय प्रशिक्षकांच्या नावाचा उल्लेखही केला.

पंत हा क्रिकेट चाहत्यांच्या मनाला भिडणारा खेळाडू आहे. त्याची आक्रमक शैली चाहत्यांना खूपच भावते. यासंदर्भातही त्याला प्रश्न विचारण्यात आला होता. यावर पंत म्हणाला की, लोक अपेक्षा ठेवत असतील तर ती सन्मानाची बाब आहे. पण त्याच वेळी अपेक्षा बाजूला ठेवून खेळावर लक्षकेंद्रीत करण्याचे मोठे आव्हानही असते. ज्यावेळी तुम्ही एखाद्या संघाचे नेतृत्व करत असता त्यावेळी आणखी जबाबदारी येते. तुम्ही केवळ तुमच्यापूरता विचार करुन चालत नाही. वेगवगळ्या लोकांना समजून घ्यावे लागते. त्यांच्यासोबत चर्चाही करावी लागते.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply