IPL 2022 : आयपीएलच्या तिकिटांची ‘भाववाढ’

मुंबई : बहुचर्चित आयपीएलचे बिगुल येत्या शनिवारपासून वाजत आहे आणि सुरुवातीच्या सामन्यांना २५ टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे, पण त्यासाठी स्टेडियमध्ये जाऊन सामने पाहायचे असल्यास खिसा खाली करावा लागणार आहे. मुंबई-पुण्यात होणाऱ्या चारही स्टेडियमचा आढावा घेतल्यास कमीत कमी ८०० ते जास्तीत जास्त ८ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. मुंबई-पुण्यात जास्त दर आहे, मात्र नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर ८०० रुपयांपासून तिकीट दर आहे.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला २६ मार्चपासून मुंबईत सुरुवात होणार आहे. जगातील सर्वोत्तम टी-२० लीग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेतील लढतींच्या तिकीट विक्रीला २३ मार्च अर्थातच बुधवारपासून सुरुवात झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मात्र प्रत्येक लढतीसाठी स्टेडियममध्ये २५ टक्के प्रेक्षकांनाच परवानगी देण्यात येणार आहे.

मुंबई, नवी मुंबई व पुणे या तीन स्थळांवरील चार स्टेडियम्समध्ये आयपीएलच्या साखळी फेरीच्या लढती रंगणार आहेत. साखळी फेरीच्या ७० लढतींचा थरार महाराष्ट्रातील क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळणार आहे. वानखेडे व डी. वाय. पाटील या दोन स्टेडियम्समध्ये प्रत्येकी २० लढती, तर ब्रेबॉर्न व पुण्यातील एमसीए स्टेडियममध्ये प्रत्येकी १५ लढती खेळवण्यात येणार आहेत.

वानखेडे स्टेडियमचे तिकीट दर

स्पर्धेची सलामी वानखेडे स्टेडियवर होत असून गतविजेते चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता यांच्यात लढत होणार आहे. वानखेडेवर कमीत कमी २,५०० ते जास्तीत जास्त ४ हजार रुपये असा तिकीट दर आहे.

ब्रेबॉर्नवर स्टेडियमवर दोनच दर

वानखेडे स्टेडियपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर ३ हजार आणि ३,५०० असे दोनच तिकीट दर ठेवण्यात आले आहे. मुंबई इंडियन्सची सलामी दिल्लीविरुद्ध याच स्टेडियवर रविवारी होत आहे.

महागडे तिकीट पुण्यात

पुण्यातील एमसीए इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये आयपीएलचा पहिला सामना २९ मार्चला राजस्थान रॉयल्स - सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये होणार आहे. कमीत कमी तिकीट दर एक हजार त्यानंतर १,५०० - १,७५०, जास्तीत जास्त ८,००० रुपये आहे. सुरुवातीच्या लढतींसाठी आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील सर्वात महागडे तिकीट पुण्यातील लढतींचे असणार आहे.

डी. वाय. पाटील स्टेडियमचा तिकीट दर कमी

नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर वानखेडे व ब्रेबॉर्न स्टेडियमच्या तुलनेने या स्टेडियममध्ये होणाऱ्या लढतींचा तिकीट दर कमी ठेवण्यात आला आहे. येथे होणाऱ्या लढतींसाठी ८००, १२००, १५००, २००० व २५०० असा तिकिटांचा दर ठेवण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply