Indore Crime : मुस्लिम तरुणीसोबत फिरणाऱ्या हिंदू मुलाला बेदम मारहाण, मुख्यमंत्र्यांचे कडक कारवाईचे आदेश

Crime News : मध्य प्रदेशामधील इंदौर शहरात मुस्लिम मुलीसोबत फिरणाऱ्या एका हिंदू मुलाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. तर मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या लोकांवर आरोपींनी चाकूने हल्ला केला. पोलिसांनी चाकू हल्ला करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

एका पोलीस अधिकाऱ्याने शुक्रवारी या घटनेची माहिती दिली आहे. मध्यप्रदेशातील इंदौरमधील एका हॉटेलमधून बाहेर पडताना एका हिंदू मुलाला आणि मुस्लिम तरुणीला मारहाण करण्यात आल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. तरुणीला वाचवण्यासाठी आलेल्या दोघांवरही चाकूने हल्ला करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 20 लोकांच्या प्रचंड गर्दीतील दोघांना अटक करण्यात आली आहे.

इंदौरचे अतिरिक्त पोलिस उपायुक्त राजेश रघुवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'गुरुवारी रात्री एक हिंदू मुलगा आणि एक मुस्लिम मुलगी एका हॉटेलमध्ये जेवत होते. हॉटेलमधून बाहेर पडत असताना काही मुस्लिम लोकांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना अडवले आणि या लोकांनी मुलीला हिंदू मुलासोबत फिरण्याबाबत हरकत घेतली आणि ती हिंदू मुलासोबत का फिरते असे तिला विचारले. तर या लोकांनी मुलालाही मारहाण केली.

अतिरिक्त डीसीपीने दिलेल्या माहितीनुसार, मुलीने सांगितले की, ती तिच्या पालकांना सांगून हिंदू तरुणासोबत जेवायला गेली होती. उपस्थित जनसमुदाय ज्या प्रकारे वागला. त्यावरही मुलीने आक्षेप घेतला. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दोन तरुणांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता जमावाकडून त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला.

हे संपूर्ण प्रकरण शहरातील तुकोगंज पोलीस ठाण्याशी संबंधित आहे. संध्याकाळी उशिरा एक मुस्लिम मुलगी तिच्या हिंदू मित्रासोबत जेवण करून हॉटेलमधून निघाली, तेव्हा त्या दोघांना काही मुस्लिम मुलांनी घेरले. त्यांनी मुलीला बुरखा घालून घरी राहण्यास सांगितले. या मुलांनी मुलीला इस्लाम धर्माबाबत अनेक प्रकारचे सल्लेही दिले. हिंदू मुलाने त्यांना विरोध केला असता या तरुणांनी त्याला बेदम मारहाण केली.

सीएम शिवराज यांचे कडक कारवाईचे आदेश

तुकोगंज पोलिस स्टेशनचे प्रभारी कमलेश शर्मा यांनी सांगितले की, भारतीय दंड संहितेच्या कलम 307 (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आतापर्यंत सात आरोपींची ओळख पटली आहे. तर 23-26 वर्षे वयोगटातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अन्य आरोपींच्या अटकेसाठी पोलिस तपास करत आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या संपूर्ण प्रकरणात कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply