India vs Sri Lanka : विजयरथाची आज वानखेडेवर सवारी! धावांचा पाऊस तर मोहम्मद सिराजची परीक्षा

India vs Sri Lanka : चेन्नईपासून सुरू झालेला विश्वकरंडकातील भारताचा विजयरथ आता क्रिकेटच्या पंढरीत आलाय आणि आज त्याची वानखेडे स्टेडियमवर थाटात सवारी होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र श्रीलंकेला कमजोर न समजता आपला बलशाली खेळ साकार केला तर एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरी निश्चित होईल आणि याच मैदानावर होणाऱ्या उपांत्य सामन्याची तयारीही करता येईल.

एका तपापूर्वी याच वानखेडे स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यात अंतिम सामना झाला होता. धोनीच्या त्या ऐतिहासिक षटकारानंतर भारतासाठी इतिहास घडला होता. आता उद्याच्या सामन्यातही श्रीलंकाच प्रतिस्पर्धी आहे, मात्र परिस्थिती बदललेली आहे. भारत सर्व सामने जिंकून पहिल्या स्थानावर आहे, तर श्रीलंका दोन विजयांसह सातव्या क्रमांकावर आहे.

India Vs New Zealand World Cup : इतिहास घडला , न्यूझीलंडचा चार विकेटने पराभव, विराट कोहलीची 95 धावांची झुंजार खेळी

भारतीय संघ कमालीचा फॉर्मात आहे. हा विजयरथ रोखणे श्रीलंकेसाठी सोपे नसेल. दोन दिवसांपूर्वीच पुण्यात त्यांचा अफगाणिस्तानने पराभव केला होता. त्यामुळे मानसिकतेत बदल करून भारताला टक्कर देण्यासाठी श्रीलंकेला फार मेहनत घ्यावी लागेल. ही विश्वकरंडक स्पर्धा सुरू होण्याअगोदर झालेल्या आशिया करंडक स्पर्धेत भारताने श्रीलंकेचा धुव्वा उडवून विजेतेपद मिळवले होते, तेथून सुरू झालेला हा विजयरथ कायम आहे.

आजचा सामना जिंकून भारताने उपांत्य फेरी निश्चित केली तर याच वानखेडे स्टेडियमवर भारताचा उपांत्य सामना होईल. त्यामुळे हा सामना सरावाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरणार आहे, पण पुढचा विचार करण्यापेक्षा रोहित शर्माचा संघ आजच्या सामन्यावरच लक्ष केंद्रीत करेल.

वानखेडेवर धावांचा पाऊस

या विश्वकरंडक स्पर्धेत वानखेडेवर दोन सामने झाले आहेत. हे दोन्ही सामने दक्षिण आफ्रिकेचे होते. त्यांनी बांगलादेशविरुद्ध ५ बाद ३८३, तर इंग्लंडविरुद्ध ७ बाद ३९९ धावांचा पाऊस पाडला होता. खेळपट्टी आणि जवळ असलेली सीमारेषा पाहता उद्या भारतीय संघाकडूनही तीनशेच्या पलीकडे धावा अपेक्षित आहेत.

खेळपट्टीचा फायदा घेण्यासाठी श्रीलंकेकडेही नावाजलेले फलंदाज असले तरी भारतीय गोलंदाजी फॉर्मात आहे. जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमी यांचा मारा खेळणे सर्वांनाच अवघड गेले आहे.

घरच्या मैदानावर चार मुंबईकर

कर्णधार रोहित शर्मासह सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूर या चार मुंबईकरांसाठी हे घरचे मैदान आहे. यातील शार्दुलला पुन्हा एकदा राखीव खेळाडूतच राहावे लागेल; तर हार्दिक पंड्या अजून तंदुरुस्त न झाल्यामुळे श्रेयस अय्यरला आणखी एक संधी मिळेल, पण श्रेयसला आपला कच्चा दुवा बाजूला ठेवून आपली निवड सार्थ ठरवण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतील.

मोहम्मद सिराजचीही परीक्षा

याच श्रीलंकेविरुद्ध आशिया करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वादळी गोलंदाजी करून सहा विकेट मिळवणारा मोहम्मद सिराज त्यानंतर मात्र प्रभावहीन ठरत आहे. आता श्रेयस अय्यरप्रमाणे त्यालाही आपली जागा निश्चित ठेवण्यासाठी प्रभाव पाडावा लागणार आहे.

डेंगीच्या आजारातून परतणाऱ्या शुभमन गिलला स्पर्धेत एकच अर्धशतक करता आले आहे. त्यामुळे श्रेयस, सिराज आणि गिलसाठी हा सामना लय मिळवण्यासाठी महत्त्वाचा आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply