IMD Rain Alert : महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा जोर, अनेक जिल्ह्यांना तडाखा; आज कुठे मुसळधार सरी? भारतीय हवामान विभाग (IMD)चा ताजा अंदाज

Mumbai : महाराष्ट्रात मागील दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली असून विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. अशातच आज पुन्हा हवामान खात्याने काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यांमध्ये आज विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांसाठी 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्येही विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या इतर भागांमध्ये ढगाळ वातावरण कायम राहणार असून उन्हाळ्याच्या दिवसांतील तापमान वाढ सुरूच राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी?
सोलापूर शहरासह, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, वैराग, उत्तर सोलापूर तालुक्यांत सोमवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. मैंदर्गी येथे सायंकाळी गारांचा पाऊस झाला. विजांच्या कडकडाट अवकाळी पाऊस पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. हवामान विभागाने रविवारीच अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. सोमवारी पहाटेपासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कमी-अधिक प्रमाणात शहरासह जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मंद्रुप परिसरात कडक जमिनीवर पाणी वाहील इतका पाऊस पडला. ज्वारी जमीनदोस्त झाल्याने काढणीला आलेल्या कणसांचे मोठे नुकसान झाले आहे. हरभरा पिकाचेही नुकसान झाले आहे.

मराठवाड्यात अवकाळी पाऊस
राज्यात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मराठवाड्यातील हवामानात बदल झाला आहे. सोमवारी पहाटे मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, बीड, हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपले. छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यांत ढगाळ वातावरण होते. दरम्यान सोमवारी रात्री धाराशिवमध्ये पुन्हा पावसाने हजेरी लावली. लातूर जिल्ह्यात गारपीट झाल्याने पिकांचे नुकसान झाले. सोमवारी सकाळी धाराशिव शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. उमरगा तालुक्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. त्याचा जनजीवनावर परिणाम दिसून आला. धाराशिव जिल्ह्यात रब्बीची पिके काढणीच्या अवस्थेत आहेत. त्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ढगाळ वातावरणामुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार धाराशिव जिल्ह्यात पुढील २४ तासांत पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

लातूर जिल्ह्यातील लातूर, रेणापूर, चाकूर तालुक्यात रविवारी मध्यरात्री व सोमवारी सकाळी पाऊस झाला. रेणापूर तालुक्यात सोमवारी दुपारी चार ते पाचच्या सुमारास गारपीट झाली. वाऱ्यामुळे काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेले. अवकाळी पावसाने गहू, हरभरा, ज्वारीचे काही प्रमाणात नुकसान झाले. परभणी शहरात गंगाखेड, पालम तालुक्यांतील काही भागात सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. काढणीला आलेल्या रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. सोमवारी सकाळपासून कडक ऊन होते. दुपारी तीनच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. परभणी जिल्ह्यातील आनंदवाडी, चाटोरी, बोरगाव, बंदरवाडी, खडी, नाव्हा, नाव्हलगाव, कांदलगाव या गावांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई व परळी तालुक्यातील अनेक गावांत पाऊस व गारपीट झाली.

विदर्भालाही बसला फटका
विदर्भातील नागपूर, भंडारा, वर्धा, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. सोमवारी पहाटेच्या सुमारास बरसलेल्या या सरींमुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात गारपीट झाल्याने नुकसानीची तीव्रता वाढली आहे. नापिकीला सामोरे जात असतानाच आता हे नवे संकट आल्याने शेतकरी हादरला आहे. नुकसानीचे तत्काळ सर्वेक्षण करून तातडीची भरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
रविवारच्या रात्रीपासूनच वातावरणात अचानक बदल होऊन ढग दाटून आले. सोमवारच्या मध्यरात्रीनंतर विजांचा कडकडाट व हलक्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्याने शेतात काढणीसाठी ठेवलेला हरभरा, तूर, मूग आदी कडधान्य, पिके भिजली. फळबागांनाही या पावसाचा फटका बसला असून, आंबा व इतर बागायती पिकांवरील मोहोर गळण्याची शक्यता आहे. नागपुरात मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. दमदार पावसामुळे काही काळ वीजही गायब झाली होती. भंडाऱ्याही सरींचा जोर अधिक होता. सिरोंचात सोमवारी सायंकाळच्या सुमारास तुरळक सरी कोसळल्या.

यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. रविवारी रात्री व सोमवारच्या सकाळी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यात गहू व हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राळेगाव, मारेगाव, कळंब, केळापूर, उमरखेड, महागाव आणि दिग्रस तालुक्यातील अनेक गावांना या पावसाचा फटका बसला. उमरखेड तालुक्यातील मुळावा, तिवरंग, झाडगाव, विडूळ; महागाव तालुक्यातील वाकान, कोनदरी, वनोली, चिंचपाड या गावांमध्ये नुकसानीची तीव्रता अधिक आहे. काही ठिकाणी गहू व हरभरा काढणीचे काम सुरू होते. राळेगाव तालुक्यातील काही गावांत गारपीट झाल्याने नुकसानीचा आकडा वाढणार आहे.

५३४ हेक्टरला फटका
महसूल विभागाने शेतीच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज जाहीर केला आहे. यात ५३४ हेक्टरवरील गहू व हरभरा पिकांचे नुकसान झाले. त्यात केळापूर १५ हेक्टर, उमरखेड ६५ हेक्टर, दिग्रस २५० हेक्टर, मारेगाव २०४ हेक्टरवरील नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यासह इतर तालुक्यांतही नुकसानीची पाहणी सुरू आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *