Icc T20i World Cup 2026 : गुरुवारी 3 सामन्यांचा थरार, नेपाळ विजयाचं खातं उघडणार?

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत गुरुवारी 12 फेब्रुवारीला 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. यजमान टीम इंडिया आपल्या मोहिमेतील दुसर्‍या सामन्यात नामिबिया विरुद्ध 2 हात करणार आहे. हा सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे.  टीम इंडिया हा सामना जिंकून सलग दुसरा विजय मिळवण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया विरुद्ध नामिबिया यांच्यातील सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30  मिनिटांनी टॉस होणार आहे.  भारताचा सामना गुरुवारी सर्वात शेवटी होणार आहे. त्याआधी कोणते 2 सामने होणार? कुणासमोर कुणाचं आव्हान असणार? हे जाणून घेऊयात.

श्रीलंका विरुद्ध ओमान

गुरुवारी होणाऱ्या पहिल्या सामन्यात बी ग्रुपमधील 2 संघ आमनेसामने असणार आहेत. श्रीलंका विरुद्ध ओमान यांच्यात ही लढत होणार आहे. या सामन्याचं आयोजन हे पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 11 वाजता सुरुवात होणार आहे. दोन्ही संघांचा हा या मोहिमेतील दुसरा सामना आहे. श्रीलंकेने आयर्लंडवर मात करत विजयी सलामी दिलीय. तर ओमानला झिंबाब्वे विरुद्ध पराभूत व्हावं लागलंय. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना श्रीलंका-ओमान सामन्यात उलटफेर पाहायला मिळणार का? याकडे लक्ष असणार आहे.

दिवसातील दुसरा सामना कधी?

गुरुवारी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात नेपाळ विरुद्ध इटली भिडणार आहेत. इटलीची वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर इटलीच्या तुलनेत नेपाळ अनुभवी संघ आहे. इटलीला आपल्या मोहिमेतील पहिल्या सामन्यात स्कॉटलँड विरुद्ध पराभूत व्हावं लागलंय. नेपाळला आपला पहिला सामना अवघ्या 4 धावांनी गमवावा लागला. नेपाळने इंग्लंड सारख्या वर्ल्ड कप विजेत्या संघाला पहिल्या सामन्यात घाम फोडला होता. रविवारी 8 फेब्रुवारीला झालेल्या सामन्यात इंग्लंडने नेपाळ  विरुद्ध फक्त नि फक्त 4 धावांनी विजय मिळवला होता.

त्यामुळे आता नेपाळ इटली विरुद्ध सामना जिंकून विजयाचं खातं उघडू शकते. नेपाळला विजय मिळवून सुपर 8 मधील आव्हान कायम ठेवण्याची संधी आहे. तसेच नेपाळने विजय मिळवल्यास त्यांना इंग्लंडला मागे टाकून सी ग्रुपमधील पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी पोहचण्याची संधी आहे. ताज्या आकडेवारीनुसार सी ग्रुपमध्ये वेस्ट इंडिज पहिल्या, स्कॉटलँड दुसऱ्या आणि इंग्लंड तिसऱ्या स्थानी विराजमान आहेत. त्यामुळे आता इटली आणि नेपाळ सामन्यात कोण मैदानात मारतं? याची उत्सूकता शिगेला पोहचली आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *