Akola H3N2 News : अकोल्यात H3N2 ने घेतला पहिला बळी; ७ वर्षीय मुलाचा मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह

Akola News: अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अकोल्यात एच-३ एन-२ विषाणूने पहिला बळी घेतला आहे. शहरातील चिल्ड्रन हॉस्पिटल मध्ये दाखल असलेल्या व दुर्दैवाने मृत्यू झालेल्या वाशिम येथील एका सात वर्षीय मुलाचा अहवाल गुरुवार 'एच-३ एन-२' पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून नागरिकांना न घाबरता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आले आहे. 

कोरोनाच्या दहशतीतून आता कुठं सावरत असतांनाच 'एन्फ्लुएन्झा ए' या विषाणूचा उपप्रकार असलेल्या 'एच३ एन२'चा देशभरात झपाट्याने फैलाव होत असल्याच्या घटना समोर येत आहे.स्वाईन फ्लू चा प्रकार असलेल्या या आजाराने अकोल्यातही एंट्री केली असून एका सात वर्षीय मुलाचा मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक बाब गुरुवारी समोर आली आहे.

अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ मीनाक्षी गजभिये यांनी याबाबत माहिती दिली आहे. एका सात वर्षीय मुलाचा अहवाल मृत्यूनंतर एच-३ एन-२ पॉझिटिव्ह आला आहे. नागरिकांनी घाबरुन न जाता. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काळजी घेणे गरजेचे आहे. मास्कचा वापर करणे गरजेचे आहे, असं गजभिये यांनी सांगितलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून घरोघरी सर्दी व तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.ताप असलेल्या सर्व रुग्णांची तपासणी होत नसल्याचे वास्तव असून यामध्ये 'एच-३ एन-२' आणि 'एच-१ एन-१' चे देखील मोठ्या प्रमाणात रुग्ण असल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे.या आजाराचा फैलाव होण्याचा वेग मोठ्या प्रमाणात असून लहान मुले, वृद्ध आणि दुर्धर आजार असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

एच-३ एन-२ ची लक्षणे कोणती?

खूप ताप येणं, त्वचा उबदार व ओलसर होणं, चेहरा लाल होणं, डोळे पाणावणं, सर्दी, अंगदुखी, कफ नसलेला खोकला, डोकेदुखी ही या आजारांची गंभीर लक्षणं आहेत.अशी लक्षणे आढळल्यास जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधून वेळीच उपचार घेणं महत्त्वाचे आहे. मास्क वापरणे, कोमट पाण्याचे सेवन करणे, पौष्टिक आहार घेणे महत्त्वाचे आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply